भाजप म्हणजे ‘डरपोक’ लोकांची ‘डी गँग’, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत यांचा घणाघात
आजचा भारतीय जनता पक्ष डरपोक लोकांची ‘डी गँग’ झाला आहे. भाजपमध्ये चारित्र्यवान माणसांना प्रवेश मिळत नाही. बलात्कार, विनयभंग, भ्रष्टाचार, घोटाळे, चोऱ्या, दरोडे असे गुन्हे असलेले सर्टिफिकीट घेऊन या, मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल. हीच भाजपची आचारसंहिता झाली आहे. उद्या भाजप दाऊद इब्राहिमलाही पक्ष प्रवेश देईल, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सत्ता, पैसा, दहशत वापरून फोडण्यात येत आहे. त्यांच्यावर आधी गुन्हे दाखल करण्यात आले. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि ते फरार झाले. आता हेच फरार पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी नाशिकमध्ये नक्की काय घडले याचा घटनाक्रमही सांगत राऊत यांनी भाजपला उघडे पाडले.
चार दिवसांपूर्वी नाशिकच्या पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. नाशिकमधील एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते. त्यांच्याविषयी खोट्या बातम्या देऊन ब्लॅकमेल करते. त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते. हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी त्याच्या घरात घुसून त्याला जाब विचारला. भाजपनेही आपल्या नेत्यांची बदनामी होत असेल तर असे केले आहे. हे काही नवीन नाही. हा काही 360, विनयभंग किंवा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नाही. पण पोलिसांनी गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले, असा आरोप राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळे लोक अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात गेले. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी चार दिवस फरार झाले. त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. हेच गुन्हेगार (भाजपच्या भाषेत) आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हे पोलिसांना सापडत नाहीत, पण मंत्र्याकडे येऊन भाजपमध्ये सामील होत आहेत. हीच गंमत आहे. हेच बडगुजर यांच्याबाबत झाले. आधी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांच्या कुटुंबावर दबाव आणला, मोक्का लावण्याची भीती दाखवली, सलीम कुत्ता प्रकरणाचाही ठपका होताच. मग ते भाजपमध्ये गेले. आता हे चार लोक ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत ते भाजपमध्ये सामील होत आहेत.
भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे:
नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…
क्लायमॅक्स असा की::
हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत…— Sanjay Raut (@rautsanjay61) July 3, 2025
माझे पोलीस आयुक्तांना आवाहन आहे की, आता तुम्ही काय कारवाई करणार आहात? असा सवाल राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, हे भंपक पोलीस अधिकारी वर्दीचा अपमान करत आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून आमचे 100 च्या वर लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले आणि आज हे फरार भाजपमध्ये सामील होत आहेत. मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होत आहे. फडणवीस यांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल तर या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे. अशाच पद्धतीने एक दिवस पहलगाम येथे 26 महिलांचे कुंकू पुसणारे दहशतवादी महाराष्ट्रात येतील, वर्षावर जातील आणि भाजप प्रवेश करतील. आपल्याला कळणारही नाही. कुठे गेले, तर भाजपमध्ये गेले. हे भाजपचे कॅरेक्टर आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List