कल्याण एपीएमसी निवडणूक – शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 17 जागांसाठी आज मतदान झाले. 144 उमेदवार रिंगणात होते. मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली. महायुतीच्या धनशक्तीविरोधात कडवी लढत देऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नरेश सुरोशी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गिरीश पाटील यांनी विजय मिळवला. हमाल व तोलाई गटातील एक जागा याआधीच बिनविरोध झाली होती. उर्वरित 15 जागांवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले.
18 पैकी 11 जागा सेवा संस्थांच्या प्रतिनिधींसाठी होत्या. यामध्ये सर्वसाधारण 7, महिलांसाठी 2, इतर मागासवर्गीय 1, विमुक्त जाती/ भटक्या जमातीसाठी 1 जागा राखीव होती. ग्रामपंचायत गटासाठी 4 जागा होत्या. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती/जमाती 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी 1 जागा राखीव होती. व्यापारी व अडते गटासाठी 2 जागा राखीव होत्या. तर हमाल व तोलाई गटातून अपक्ष शंकर आव्हाड बिनविरोध निवडून आले. आज 17 जागांसाठी कल्याण येथील बाजार समिती सभागृहात मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक विशाल जाधवर यांनी काम पाहिले.
90 टक्के मतदान
2358 मतदारांपैकी 2131 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चार वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर कल्याण बाजार समितीच्या हॉलमध्ये लगेचच मतमोजणी सुरू झाली. ग्रामपंचायत गटातून शिवसेनेचे नरेश सुरोशी यांनी तर व्यापारी गटातून राष्ट्रवादीचे गिरीश पाटील यांनी विजय खेचून आणला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List