हिंदी सक्तीचा आदेश टराटरा फाडला, होळी केली; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे उग्र आंदोलन

हिंदी सक्तीचा आदेश टराटरा फाडला, होळी केली; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे उग्र आंदोलन

शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासूनच हिंदीची सक्ती लादणाऱ्या महायुती सरकारविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघासमोर हिंदी सक्तीचा शासन आदेश टराटरा फाडण्यात आला. या आदेशाची जाहीर होळी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी जनता उतरली होती. शिवसेनेसह काँग्रेस, मनसे, समविचारी संघटनांचे पदाधिकारी, मराठी भाषा अभ्यासकही आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी शासन आदेशाची होळी करून निषेध नोंदवला.

शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या पुढाकाराने आझाद मैदानाजवळ मुंबई मराठी पत्रकार संघाबाहेर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी हजारो मराठी नागरिक जमले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार ज. मो. अभ्यंकर, मनसे नेते नितीन सरदेसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार, भालचंद्र मुणगेकर आणि मराठी नागरिकांनी हिंदी सक्तीच्या शासकीय आदेशाची होळी केली. शिवसैनिकांनीही यावेळी शिक्षणमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.

आता तो शासन निर्णय कुठे राहिला, त्याची होळी केली – उद्धव ठाकरे

हिंदी सक्तीचा शासन आदेश मराठी माणूस स्वीकारतच नाही, तरीही सरकार तो निर्णय लादू पाहत असेल तर आम्हीच या आदेशाची होळी करून तो विषय संपवला आहे. त्यामुळे तो शासन आदेश आहे असे मानण्याचे कारण नाही, अशी परखड भूमिका उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.

हिंदी हटवा, मराठी वाचवा

हिंदी सक्तीविरोधातील घोषणांनी यावेळी सारा परिसर दणाणून गेला होता. हिंदी हटवा, मराठी वाचवा, महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती चालणार, हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करूया, मराठी माणसाची ताकद दाखवूया, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आमचा विरोध हिंदी सक्तीला, हिंदी भाषेला नाही, असे फलक आंदोलनात झळकत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;