आज हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी; मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची उद्या आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात येणार असून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठच दाखवली जाणार आहे. कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता हे आंदोलन होईल.
केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्य सरकारने महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या सक्तीमुळे मराठमोळ्या महाराष्ट्रातच मराठीला दुजाभाव सहन करावा लागणार आहे. भाजप-मिंधे सरकारच्या काळात आधीच मराठी माणसावर अन्याय वाढले असताना आता हिंदी सक्ती केली जात असल्यामुळे मराठी माणसांकडून सरकारच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारच्या या आदेशाची होळी केली जाणार आहे.
5 जुलैच्या मोर्चाच्या तयारीला वेग; शिवसेना भवनात शाखाप्रमुखांची बैठक
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 5 जुलै रोजी आयोजित केलेल्या हिंदीसक्तीविरोधातील मोर्चात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मराठीप्रेमी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या नियोजनासाठी शिवसेना भवनात 29 जून रोजी मुंबईतील सर्व शाखाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. सायं. 5 वाजता ही बैठक होईल. दरम्यान, कृती समितीचे दीपक पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
स्थळ ः आझाद मैदान
वेळ ः दुपारी 3 वाजता
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List