आधी अपहरण नंतर अत्याचार गर्भपात करून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडलं, डोंबिवलीत अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं
डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. एका 15 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला खोलीत कोंडून ठेवण्यात आलं, तिच्यावर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर तिचा गर्भपात करून तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं, पोलिसांनी दोन महिन्यांनंतर या मुलीची सुटका केली आहे, या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी एका महिलेसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, तर या मुलीचं अपहरण करणारा आरोपी अजूनही फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे . मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीनं एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती राहिलेल्या पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तीच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अखेर टिळक नगर पोलिसांनी या महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेसह तिचा पती , दोन पुरुष अशा चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे .
सदर पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली जवळील ग्रामीण परिसरात राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. तो देखील मसाले विक्रीचा व्यवसाय करत होता. याच ओळखीचा फायदा घेत आशुतोषने पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. अल्पवयीन मुलीने दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिचे आणि तिच्या आईचे भांडण झाले . त्यामुळे रागावलेल्या पीडितेने आशुतोषशी संपर्क साधला व त्याच्या घरी गेली. या संधीचा आशुतोषने फायदा घेतला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोधा शोध करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आशुतोष हा तिच्या आईला भेटत होता व तो मुलीला मी तुमच्या मुलीला आज या ठिकाणी बघितले त्या ठिकाणी बघितले असे सांगून मुलगी शहरातच आहे असे सांगत होता. मुलगी रागवलेली असल्याने ती परत येईल या आशेने पीडितेची आई आशुतोष वर विश्वास ठेवत होती .
मात्र दोन महिन्यांपासून मुलगी घरीच न आल्याने तिला संशय आला. तिने याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. याचदरम्यान ही मुलगी डोंबिवली जवळील ग्रामीण भागात एका घरात असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत या पीडित मुलीची सुटका केली . पीडित मुलीने केलेल्या खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मुस्कान शेख तिचा नवरा यांच्यासह दोन जणांना अटक केली . चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली . आशुतोष राजपूत यानेच मुलीचं अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तीच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List