सिन्नर : पावसाने बस स्थानकाच्या छताचा भाग कोसळून मोठा अपघात, शिवशाही बसेस सह अनेक वाहनांचे नुकसान
राज्यात पावसाचा धुमाकुळ सुरु असून नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचे छत कोसळून मोठा अपघात घडला आहे. पावसाचा मारा सुरु असल्याने या स्थानकाच्या छताचा काही भाग अचानक कोसळून शिवशाही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील जोरदार पाऊस कोसळत असल्याने हे छत कोसळल्याचे म्हटले जात आहे. या अपघातात शिवशाही बसेस सह एका कारचाही चुराडा झाला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती मनुष्यहानी झालेली नाही.
शिवशाही बसेसमध्ये प्रवासी असताना हा स्लॅब कोसळ्याचे म्हटले जात आहे. या अपघातग्रस्त बसेसमधील प्रवाशांना आपात्कालिन मार्गातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. दरम्यान, बारामती आणि औंध येथे ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला असून येत्या दोन दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा पुणे वेध शाळेने दिला आहे. पुणे,सातारा जिल्ह्यात मोठा पाऊस झाला असून आणखी पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसाने पुणे- सोलापूर महामार्गावर औंध तालुक्याच अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पाण्याचा पुर आला आहे.
भ्रष्टाचाराचे आगार ! राष्ट्रवादी शरद गटाचा आरोप
सिन्नर बस स्थानक घटनेला आता वेगळं वळण लागले आहे. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भावाकडेच या बस स्थानकाच्या बांधकामाचे कंत्राट दिले होते. या बस स्थानकाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याने ते कोसळल्याचा आरोप होत आहे. या बसस्थानकाच्या दुर्घटनेनंतर बस स्थानकाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत असून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी केली आहे. सिन्नर बस स्थानक हा भ्रष्टाचाराचा नमुना असून माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतूनच या बस स्थानकाचे काम करण्यात आले होते. याच बस स्थानकात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कार्यालय देखील आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List