मुंबईतून उद्धव ठाकरे यांना धक्का, कौटुंबिक संबंध असलेल्या नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. ठाकरे कुटुंबासोबत वैयक्तीक संबंध असणाऱ्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून हा राजीनामा दिले गेल्याचे म्हटले जात आहे. यामुळे उत्तर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या सर्वात चर्चित नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना उबाठा नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांची मॉरीस नरोन्हाने हत्या केली होती.
शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. घोसाळकर कुटुंब- ठाकरे कुटुंब यांचे जवळचे संबंध आहेत. परंतु स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तेजस्वी घोसाळकर शिवसेना उबाठा नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसेच शिवसेना उबाठामधील ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. सूत्रांनुसार तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये किंवा शिंदे गट शिवसेनेत सामील होऊ शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागील महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप ग्रुपवर आली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता.
राजीनामा देताना काय म्हटले?
तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले की, मी तेजस्वी घोसाळकर महिला – दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List