सामना अग्रलेख – आधी सराव; मग युद्ध! (आज युद्ध सराव)

सामना अग्रलेख – आधी सराव; मग युद्ध! (आज युद्ध सराव)

पाकिस्तानविरुद्ध लढण्याचा ‘सराव’ मोदी यांनी सुरू केला हे बरे झाले. लोकांची मानसिकता ते तयार करीत आहेत. पाकिस्तानशी लढू व त्यांना धुळीस मिळवू असे मोदी सरकारचे धोरण आहे. कमीत कमी नुकसान व जीवितहानी न होता हे युद्ध व्हावे. कारगील युद्धात भारताचे 1500 वर ‘सैन्य’ भारतीय भूमीवरच कामी आले होते. 1971 च्या युद्धात पाकिस्तानने इंदिरा गांधींसमोर गुडघे टेकले. युद्धात नेतृत्व महत्त्वाचे ठरते. मोदी सरकारने युद्धात आघाडीवर राहावे. देशात जनतेचा युद्ध सराव चालूच राहील! देश लढायला तयार आहे. चिंता नसावी!

देशभरात भारत-पाक तणावाचे वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता काय करणार? हा प्रश्न आहे. भारत बुधवारी ‘मॉक ड्रिल’ म्हणजे युद्ध सरावाचे प्रात्यक्षिक करणार आहे. गृह मंत्रालयाने ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हवाई हल्ल्याचे भोंगे वाजवले जातील. दुश्मनांची विमाने आपल्या हद्दीत घुसल्यावर त्यांची दिशाभूल व्हावी म्हणून ‘ब्लॅक आऊट’ केला जाईल. प्रत्यक्ष हल्ला झालाच तर संरक्षण कसे करावे यासाठी विद्यार्थ्यांना वगैरे प्रशिक्षण देण्याचेही सरकारने ठरवले आहे. आज अशा पद्धतीचा युद्ध सराव होईल व त्यानंतर प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटेल असे सरकारने ठरवले आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा अनुभव ज्यांनी घेतला ती पिढी आजही हयात आहे व तेव्हाही भोंगे वाजवणे, ब्लॅक आऊट करणे वगैरे प्रकार पंधरा दिवस घडत होते. राष्ट्रभक्तीचा ज्वर तेव्हा संपूर्ण देशाला चढला होता व इंदिरा गांधी आकाशवाणीवरून देशाला प्रेरणादायक भाषणे देत होत्या. टी.व्ही., समाजमाध्यमे तेव्हा नव्हती. त्यामुळे युद्ध जसे घडले तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांसमोर येत होते. आज युद्ध सरावाआधीच ‘मीडिया’ने युद्ध सुरू केले. गमतीने असे सांगितले जात आहे की, ‘आज तक’ वृत्तवाहिनीने आताच लाहोरवर कब्जा मिळवला आहे. अदानींच्या एनडीटीव्हीने रावळपिंडीवर ताबा मिळवला तर इस्लामाबादवर एबीपीने झेंडा फडकवून पुढे कूच केली आहे. मग झी न्यूज तरी मागे कसा राहील? या ‘झी’ने कराचीत मुसंडी मारून दाऊद इब्राहीमच्या दारावर धडक मारली. या सगळ्यांनी अशा प्रकारे मुसंड्या मारल्यामुळे पाकिस्तान थरथर कापत आहे व पाकड्यांनी गुडघे टेकले असे चित्र आज निर्माण झाले आहे. ते खरे मानले तर पंतप्रधान मोदी यांनी

तीनही संरक्षण दलांचे

सेनापती, संरक्षण सचिव वगैरेंशी चर्चा करण्याऐवजी या वृत्तवाहिन्यांशीच युद्धावर चर्चा करायला हवी. सैन्य अधिकाऱ्यांपेक्षा ‘मीडिया’ सेनापतींचाच युद्ध अभ्यास आणि अनुभव जास्त आहे व देशाला हेच लोक युद्ध जिंकून देतील. कारगील युद्धाच्या वेळी अशा अनेक अतिउत्साही युद्ध पत्रकारांचा युद्धभूमीवर सुळसुळाट झाला होता आणि त्यामुळे अडथळे व अडचणी निर्माण झाल्या होत्या. युद्ध शिस्तीचा भंग झाला होता. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात युक्रेनच्या युद्धभूमीवर या वेळी अनेक पत्रकारांनी प्राण गमावले. कारण सैन्याची कवचपुंडले वापरून हे पत्रकार युद्धभूमीवर वावरत नव्हते व त्यांच्यामुळेच ‘गाझा’ पट्टीतले खरे चित्र जगासमोर आले. भारतात असे कधी घडले आहे काय? आतादेखील पंतप्रधानांनी युद्ध जाहीर करण्याआधीच ‘मीडिया’ने युद्ध पुकारले व अनेक रहस्यांचा स्फोट केला. बाबा रामदेव यांनी तर लाहोरात पतंजलीची फॅक्टरी टाकण्याचेच ठरवले. म्हणजे प्रत्यक्ष युद्धाचा बार उडण्याआधीच पाकड्यांच्या इस्टेटीचे वाटप येथील व्यापार मंडळाने केले. लढायचे इतरांनी व जिंकलेला भूभाग व्यापाऱ्यांनी लुटायचा हे धोरण आताच दिसत आहे. युद्ध ही सामान्य बाब नाही. प्रत्यक्ष युद्धापेक्षा युद्धानंतरचे परिणाम अधिक घातक ठरतात. अनेक जवानांना प्राणाचा त्याग करावा लागतो. त्यांची कुटुंबे निराधार होतात. सीमेवरील असंख्य गावांना विस्थापित व्हावे लागते व त्यांच्या घरांचे नुकसान होते. देशाची अर्थव्यवस्था नष्ट होते. मंदीचा फटका बसतो. अनेकदा अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नोकरदारांचे पगार कमी करून तो पैसा राष्ट्रीय कार्यासाठी वळवावा लागतो. बँकांतील ठेवी सरकार घेते. त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते. पुन्हा पाकिस्तानसारख्या माथेफिरू राष्ट्राने भारतीय शहरांवर

बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र

डागली तर मोठेच नुकसान होईल. हे सर्व युद्ध सरावात दिसत नाही. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व त्यांच्या कॅबिनेटच्या बचावासाठी सुरक्षित बंकर्स आतापासूनच तयार केले असतील. या सगळ्यांची मुलेबाळे परदेशात सुरक्षित बसून युद्धावर मार्गदर्शन करतील, पण भारतीय जनतेला युद्धाचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे आजच्या युद्ध सरावाकडे गांभीर्याने पाहायला हवे. जगभरात अनेक राष्ट्रे विविध प्रकारचे युद्ध सराव करीत असतात. भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान संयुक्त लष्करी सराव होत असतात. या सरावात युद्ध कौशल्याचे आदान-प्रदान होत असते. युद्ध हे फक्त बंदुका आणि तोफांचेच नसते. ते अनेक संकटांचे असते. ‘कोरोना’ हे युद्धच होते व ते प्रदीर्घ काळ चालले. कोरोना हे युद्ध असल्याचे पंतप्रधान मोदी यांनीही सांगितले होते. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. कोरोना युद्ध 21 दिवसांत संपवू असे तेव्हा मोदी म्हणाले होते, परंतु तसे घडले नाही. कोरोनाचा पराभव करण्यासाठी लोकांनी घराबाहेर येऊन थाळ्या वाजवाव्यात असे मोदींचे प्रयोजन होते. थाळ्या व घंटा वाजवून काहीच साध्य झाले नाही. अशा प्रकारचे युद्ध लढण्याचा ‘सराव’ मोदी सरकारपाशी नव्हता. आता पाकिस्तानविरुद्ध लढण्याचा ‘सराव’ मोदी यांनी सुरू केला हे बरे झाले. लोकांची मानसिकता ते तयार करीत आहेत. पाकिस्तानशी लढू व त्यांना धुळीस मिळवू असे मोदी सरकारचे धोरण आहे. कमीत कमी नुकसान व जीवितहानी न होता हे युद्ध व्हावे. कारगील युद्धात भारताचे 1500 वर ‘सैन्य’ भारतीय भूमीवरच कामी आले होते. 1971 च्या युद्धात पाकिस्तानने इंदिरा गांधींसमोर गुडघे टेकले. युद्धात नेतृत्व महत्त्वाचे ठरते. मोदी सरकारने युद्धात आघाडीवर राहावे. देशात जनतेचा युद्ध सराव चालूच राहील! देश लढायला तयार आहे. चिंता नसावी!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मला माझ्या शरीराची किळस येतेय’, करण जोहरने व्यक्त केली वेदना, म्हणाला ‘मी कपड्यांशिवाय आरशात नाही…’ ‘मला माझ्या शरीराची किळस येतेय’, करण जोहरने व्यक्त केली वेदना, म्हणाला ‘मी कपड्यांशिवाय आरशात नाही…’
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सोशल मीडियावर सध्या त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने ज्यापद्धतीने त्याचे वजन कमी...
Mockdrill नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा थरार, बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण
Operation Sindoor – हिंदुस्थानच्या 80 लढाऊ विमानांनी एअर स्ट्राइक केला, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कबुली
Nashik News ‘केटीएचएम’च्या आवारात हवाई हल्ल्याचा थरार… बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण
Rohit Sharma रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
पहलगाम हल्ल्याचे फोटो, व्हिडीओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा, NIA चे जनतेला आवाहन
फेक व्हिडीओ आणि माहितीचा प्रसार, Operation Sindoor नंतर हिंदुस्थानने सायबर सुरक्षा वाढवली