संजय राऊत यांच्या तुरुंगातल्या अनुभवांचे थरारक चित्रण,‘नरकातला स्वर्ग’चे उद्या प्रकाशन
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार आहे. या प्रकाशन सोहळय़ाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर भूषवणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राजकीय सुडापोटी संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली होती. ईडीने अन्याय्य पद्धतीने संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर तीन महिने त्यांना आर्थर रोड तुरुंगात राहावे लागले. संजय राऊत यांनी तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांचे थरारक चित्रण ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केले आहे. संजय राऊत यांच्या प्रभावी आणि आक्रमक लेखनशैलीची मुंबई महाराष्ट्रासह सबंध देशाला कल्पना आहे. त्यांचे लेखन भल्याभल्यांची झोप उडवते आणि समाजाच्या प्रत्येक थरातील माणसाला विचार करण्यास भाग पाडते. त्यामुळे राजकीय, सामाजिक असे सर्वच क्षेत्रातील विषय लीलया हाताळणारे संजय राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.
– दैनिक ‘सामना’ आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक शरद तांदळे आणि दैनिक ‘सामना’च्या मार्पेटिंग डेव्हलपमेंट विभागाचे नॅशनल हेड दीपक शिंदे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
स्थळ
रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
वेळ
सायंकाळी 6 वाजता
– प्रकाशनापूर्वी संजय राऊत यांचे हे पुस्तक तुरुंगातील गजांनी आणि तेथील रंग उडालेल्या भयाण भिंतींनी वाचले आहे. प्रकाशनानंतर ते समाजाच्या हाती असेल. त्यामुळे या पुस्तकातून नेमके काय बाहेर येतेय याबद्दल आतापासूनच राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List