इलेक्ट्रिक एसी बसेसचा ताफा प्रवाशांच्या सेवेत; ठाण्यात 160, उल्हासनगरात 100
निविदा प्रक्रियेमुळे अडलेल्या 160 इलेक्ट्रिक बसेसचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ठाणे पालिकेच्या परिवहन प्रशासनाकडून निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात कार्यादेश देण्यात आल्यानंतर पुढच्या चार महिन्यांत 160 बसेसपैकी पहिल्या टप्यात 40 इलेक्ट्रिक बसेस ठाण्याच्या परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक एसी बसेसचा ताफा प्रवाशांचा सेवेत दाखल होणार असून ठाणेकरांना अधिक गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषणविरहित इलेक्ट्रिक बसेससह वातानुकूलीत ई-बसेसचा समावेश करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात 123 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्याने सद्यस्थितीत टीएमटीच्या 446 बसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. यात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून वातानुकूलित इलेक्ट्रिक नऊ मीटरच्या 100 बसेस आणि 12 मीटरच्या 60 बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. मात्र ठेकेदारांनी जादा दराची अपेक्षा ठेवल्याने परिवहन व्यवस्थापनाने फेरनिविदा काढली. दरम्यान, येत्या चार महिन्यांत ठाणे परिवहनच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात 40 ई-बसेस दाखल होणार असून उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तब्बल 10 वर्षांनंतर उल्हासनगरवासीयांना इलेक्ट्रिक बसेसची भेट मिळणार आहे. येत्या काही महिन्यात पालिकेच्या परिवहन सेवेच्या दिमतीला 100 इलेक्ट्रिक बसेसची एण्ट्री होणार असल्याने प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली असून बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनची पाहणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून उल्हासनगरातील परिवहन सेवा कोलमडलेल्या अवस्थेत होती. आता मात्र 100 इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे. दरम्यान, बस डेपो व चार्जिंग स्टेशन सज्ज करण्याचे काम प्रगतीपथावर असून परिवहन सेवेला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येणार असल्याची प्रतिक्रिया प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली. सुरुवातीला 20 इलेक्ट्रिक बसेस तयार करण्याचे काम सुरू असून यामध्ये 10 नॉन एसी आणि 10 एसी बसेसचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List