अवकाळी पाऊस पडतोय? मग अशा वेळी ‘ही’ काळजी घ्यायला विसरू नका!
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं तर नुकसान होतंच. पण हा अवकाळी पाऊस आपल्या आरोग्यावरही परीणाम करतो. मे महिन्यात उन्हाच्या झळा अंग भाजून काढत असताना अचानक आलेला अवकाळी पाऊस थोडा गारवा देतो, पण सोबतच आरोग्याच्या समस्यांनाही निमंत्रण देतो. त्यामुळे अवकाळी पावसानंतर शरीराची आणि घराचीही योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
अवकाळी पावसात भिजल्यावर काय काळजी घ्याल?
पावसात भिजल्यावर कधीही थेट थंड पाण्याने आंघोळ करू नका. गरम किंवा कोमट पाण्यात मीठ टाकून आंघोळ करणे केव्हाही हितावह. असे केल्याने सर्दी, खोकला, ताप यापासून संरक्षण मिळते.
आहारात बदल करा
आपला आहार हा कायमच ऋतूमानाला साजेसा असाच हवा. पावसानंतर जड, तुपकट पदार्थ टाळा. त्याऐवजी हळद-आल्याचा काढा, ताजी फळे, उकडलेले भाज्या आणि पुरेशी पाणी पिणे याकडे लक्ष द्या. हळदीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.
ओले कपडे त्वरित बदला
पावसात भिजल्यावर अनेकदा आपण ओले कपडे अंगावर तसेच ठेवतो. ओल्या कपड्यांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर कोरडे, सुती कपडे परिधान करा. आॅफिसमध्ये सुक्या कपड्यांचा एक जोड नेऊन ठेवावा. म्हणजे पावसात भिजून गेल्यानंतर, कपडे बदलता येतील.
त्वचेची विशेष काळजी
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून अनेक रोग पसरतात. त्यामुळे आपल्या पायाच्या बोटांमध्ये चिखल्यासारखे त्वचारोग होतात. मूळात पावसाच्या पाण्यातून त्वचारोग अधिक प्रमाणात फोफावतात. त्यामुळेच पावसामध्ये त्वचेची खासकरून काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. पाण्यातून वाट काढत घरी गेल्यावर, सर्वात आधी हात पाय स्वच्छ घासून धुणे खूप गरजेचे आहे. पावसाच्या पाण्यात असलेल्या धुळीमुळे त्वचेवर रॅशेस, एलर्जी होऊ शकते. त्यामुळे पावसात भिजल्यावर चेहरा आणि हात-पाय स्वच्छ धुणे, तसेच मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
मानसिक शांततेसाठी वेळ द्या
ऋतू कुठलाही असो, मानसिक शांतता ही आपल्यासाठी खूप गरजेची आहे. अवकाळी पावसामुळे दैनंदिन कामांमध्ये अडथळा येतो. अशावेळी गरम चहा सोबत एखादे पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे याने मन प्रसन्न राहते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List