विजय शाह यांचे विधान अक्षम्य, त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा! कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांचा संताप
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल विजय शाह यांनी केलेले विधान अक्षम्य असून त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईची आणि यशाची माहिती जगाला देणाऱया कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले आणि मोदींनी त्यांच्या बहिणीला त्यांना मारण्यासाठी त्यांच्या घरी पाठवले, असे विधान मध्य प्रदेशचे भाजपचे मंत्री विजय शाह यांनी केले होते. या विधानावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री शाह यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर कर्नल सोफिया यांचे काका, चुलत भाऊ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शाह यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शाह हे संवैधानिक पदावर आहेत. त्यांचे हे विधान अक्षम्य आहे. सोफिया ही आपल्या देशाची, एका लष्करी अधिकाऱयाची मुलगी असून तिने देशासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. शाह यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा, अशी मागणी सोफिया यांचे चुलत भाऊ बंटी सुलेमान यांनी केली आहे.
भाजप नेत्यांनी घरी येऊन कारवाईचे आश्वासन दिले
भाजप नेते घरी आले होते. त्यांनी शाह यांच्या विधानावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही बंटी सुलेमान म्हणाले. भंवर राजा आणि भाजप जिल्हाध्यक्ष आमच्या घरी आले होते. सोफिया ही देशाची मुलगी आहे. शाह यांच्यावर कारवाई केली जाईल. पेंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने मंत्र्यांच्या विधानाची दखल घेतली असून मंत्र्यांनी सोशल मीडियावर माफीही मागितली आहे. पक्ष हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे, असे नौगाव भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रभान सिंग म्हणाल्याचे सुलेमान यांनी सांगितले.
मंत्री असे कसे बोलू शकतो,सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या मंत्र्याला फटकारले
तुम्ही मंत्री आहात. संविधानिक पदावर असलेली व्यक्ती असे कसे बोलू शकते? अशा संवेदनशील काळात तुम्ही विचारपूर्वक बोलले पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भाजपचे मंत्री विजय शाह यांना फटकारले. तसेच उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळली. दरम्यान, शाह यांच्या विधानावरून दाखल एफआयआरच्या भाषेवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List