मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिला रणबीरच्या ‘रामायण’चा पहिला रिव्ह्यू
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका आहेत. रामायणावर आधारित या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ते ‘रामायण’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिसून येत आहेत. मुंबईतल्या बीकेसीमध्ये पार पडलेल्या ‘वेव्हज 2025’ या परिषदेत ते लेखक आणि निर्माते नमित मल्होत्राशी बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, “माझ्या मते, तुम्ही योग्यच म्हणालात.. आपण या जगातील सर्वांत जुने कथाकार आहोत. आपली कला, नाट्य आणि संगीत हे खूप जुनं आहे आणि आपल्याला आता या सर्वांना आता फक्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडायचं आहे. तुम्ही हेच करत आहात असं मला वाटतं. काल जेव्हा मी पंतप्रधानांसोबत तुमच्या सेटला भेट दिली, तेव्हा तुम्ही बनवत असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची गुणवत्ता पाहून मी भारावून गेलो. आपल्या नव्या पिढीला अशाच पद्धतीने कथा सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही जे काम करत आहात, ते या जगात सर्वोत्कृष्ट असेल असा मला विश्वास आहे.”
नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटात साई पल्लवी ही सीतेच्या, रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या आणि यश हा रावणाच्या भूमिकेत आहे. यामध्ये सनी देओल, रवी दुबे आणि लारा दत्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा पहिला भाग पुढच्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होईल.
‘रामायण’ हा भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ठरला असून त्याचा बजेट 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाची चर्चा जागतिक स्तरावर व्हावी यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. रणबीर आणि साईचा हा चित्रपट तब्बल 835 कोटी रुपयांमध्ये बनणार आहे. हा बजेट फक्त रामायणच्या पहिल्या भागाचा आहे. त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागासाठी याहून अधिक खर्च केला जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List