मिठी गाळ भ्रष्टाचार प्रकरण; कंपनीच्या दोघा संचालकांना अटक
मिठी नदीतील गाळ उपसा भ्रष्टाचारप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीने आज भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कंपनीच्या दोघा संचालकांना अटक केली. केतन कदम आणि जय जोशी अशी त्यांची नावे आहेत. मिठीतील गाळ उपशातील भ्रष्टाचारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात मंगळवारी पाच कंत्राटदार, तीन पालिका अधिकारी आणि दलालांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यात केतन कदम आणि जय जोशी यांची नावे होती.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदीतील गाळ उपशात झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी 20 फेब्रुवारी 2024 रोजी एसआयटी स्थापन केली होती. त्यानुसार, एसआयटीने 2005 ते 2023 दरम्यान मिठी नदीतील गाळ उपसा आणि सुशोभीकरणाची सर्व पंत्राटे तपासण्याचे काम सुरू केले. प्राथमिक चौकशीत 2005 पासून या प्रकरणात 18 पंत्राटदार सहभागी असल्याचे आढळले. नालेसफाईत तब्बल 1,100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, एसआयटीने हा भ्रष्टाचार 65 कोटी 54 लाखांचा असल्याचे स्पष्ट करत आझाद मैदान पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर आज एसआयटीने व्होडर इंडिया एलएलपीचे संचालक केतन कदम आणि मे. विरगो स्पेशालिटीज प्रा.लि.चे संचालक जय जोशी यांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List