‘आश्रम 3’च्या शूटिंगदरम्यान अदिती पोहणकरच्या वडिलांचं निधन; म्हणाले “माझ्यासाठी परत येऊ नकोस.. “
‘आश्रम’ या वेब सीरिजचे तीन सिझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि या तिनही सिझन्सला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी या वेब सीरिजचा तिसरा सिझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला. यामधील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडली आहे. या सीरिजमध्ये पम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहणकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला. ‘आश्रम’च्या शूटिंगदरम्यानच अदितीवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. या कठीण काळाचा तिने कशा पद्धतीने सामना केला आणि तिच्या वडिलांनी आधार दिला, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.
‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, “जेव्हा मी आश्रम या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिझनसाठी शूटिंग करत होते, तेव्हाच माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझ्यासाठी तो अत्यंत कठीण काळ होता. रील लाइफमध्ये (पडद्यावरील) तुम्ही भावनांचं चित्रण करता आणि एक शॉट संपताच मूव्ह ऑन होता. परंतु रिअल लाइफमध्ये तुम्ही या गोष्टींमध्ये समतोल साधणं सोपं नसतं. या गोष्टींबद्दल मी शिकत गेले. आश्रम माझ्यासाठी खूप खास आहे कारण, माझ्या वडिलांनी त्याचं शूटिंग सुरू ठेवण्यासाठी खूप प्रोत्साहन, हिंमत दिली होती. ते म्हणाले होते की माझ्याकडे परत येऊ नकोस, कारण मला त्याने आनंद मिळणार नाही. त्यांनी म्हटल्याप्रमाणेच मी केलं होतं. वडिलांनी जसं सांगितलं, तसंच मी केलं. याच गोष्टीने मला आणखी सक्षम बनवलंय.”
याविषयी तिने पुढे सांगितलं, “भावनिकदृष्ट्या मी खचले होते, परंतु माझे वडील फार खंबीर होते. त्यांना त्यांचा अखेरचा क्षण कधी येणार हे माहित होतं आणि त्या अवस्थेतही ते माझ्याशी बोलत होते. माझ्या आईसाठी मी या गोष्टीचा वापर ताकदीच्या रुपात केला. जेणेकरून आईसुद्धा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सज्ज राहील.”
या मुलाखतीत अदितीने नुकत्याच घडलेल्या एका घटनेविषयीही सांगितलं, ज्यामध्ये ती जखमी झाली होती. “मी काही दिवसांपूर्वी एका रंजक वेब सीरिजसाठी शूटिंग करत होती. ती लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमधील अॅक्शन सीन शूट करताना मला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही मी माझं शूटिंग पूर्ण केलं. कलाकाराचं आयुष्य इतकं सोपं नसतं. एखादा खेळाडू जखमी झाला असेल तर त्याला बरा होण्यासाठी वेळ दिला जातो. परंतु एखाद्या मोठ्या सेटवर अनेक लोक तुमच्या प्रतीक्षेत असता. तेव्हापासून मी माझी अधिक काळजी घेऊ लागले आहे”, असं तिने स्पष्ट केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List