रोखठोक – युद्ध खरंच होईल काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक युद्धाचे वातावरण भाजपनेच निर्माण केले. आता जातनिहाय जनगणनेचा विषय आणून युद्धाची हवा थंड करणारेही आपले पंतप्रधान मोदीच. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्यानंतर युद्ध. ते खरंच होईल काय? 56 इंच छातीवालेही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत!
भारत-पाकिस्तान युद्ध खरंच होईल काय? यावर चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदी यांनी जातीय जनगणनेचा निर्णय जाहीर केला. भारत-पाक गरमागरम युद्ध चर्चेची दिशा त्यामुळे बदलली. भारत-पाक हे धर्मयुद्ध होते. जात जनगणनेच्या निर्णयाने धर्मावर जातीने मात केली. लोक आता जातीवर चर्चा करीत आहेत. हे असले पराम आणि उपाम फक्त भाजपलाच जमू शकतात. युद्ध होईल असे वातावरण स्वत: पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केले. पंतप्रधान मोदी हे सध्या तिन्ही लष्करप्रमुखांशी चर्चा करीत आहेत. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या बैठकांना उपस्थित आहेत एवढेच दिसते. पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाचा उद्रेक झाला. त्या 24 तासांत पाकिस्तानविरोधात पहिली कठोर कारवाई व्हायला हवी होती, पण पाकिस्तानवर किरकोळ कारवाया करून मोदी हे बिहारात निवडणूक प्रचारासाठी पोहोचले. मोदी आणि नितीश कुमार हे एकमेकांशी `प्रसन्न’ अवस्थेत गप्पा मारीत आहेत हे चित्र तेव्हा अनेकांनी अनुभवले. पाकिस्तानला दम भरण्यासाठी मोदी यांनी बिहारची भूमी निवडली. 26 मृतांची राख थंड होण्याची गरज त्यांना भासली नाही. मोदी यांनी दिल्लीतच थांबायला हवे होते व सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित राहायला हवे होते. मोदी यांना या उपचाराची गरज भासली नाही. श्री. राहुल गांधी हे अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले. सर्वपक्षीय बैठकीत ते सहभागी झाले. कश्मीरात जाऊन जखमींची भेट घेतली. या सगळय़ात देशाचे पंतप्रधान मोदी व ज्यांच्यावर पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी होती ते गृहमंत्री अमित शहा कोठे आहेत? गृहमंत्र्यांनी कश्मीरातील हल्ल्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही व सर्वपक्षीय बैठकीत हल्ल्यास जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा कोणी मागितला नाही. “या संकटप्रसंगी आम्ही सरकारबरोबर आहोत,” असे गुळमुळीत सांगण्यासाठी बैठक झाली. हा पहलगाममध्ये मरण पावलेल्यांचा अपमान आहे. पुलवामा, उरी, मणिपूरपासून पहलगामपर्यंत जे घडत आहे, त्या संकटकाळात सरकारबरोबर राहणाऱ्या विरोधी पक्षाला यापुढे सरकारला जाब विचारण्याचा अधिकार नाही.
घाम फुटला
युद्ध सुरू होण्याआधीच पाकिस्तानचे सैन्य अधिकारी, जनरल यांना घाम फुटला आहे व ते चळाचळा कापू लागले आहेत असे चित्र भारतीय वृत्तवाहिन्यांवर 24 तास दाखवले जात आहे ते खरेच मानले पाहिजे. भारताची सैन्य क्षमता पाकिस्तानच्या तुलनेत प्रचंड आहे. त्यामुळे पाकिस्तान ‘चळाचळा’ कापते हे बरोबर आहे. मग पाकिस्तान ज्यांना दहशतवादी कारवायांसाठी भारतात पाठवते ते अतिरेकी बिनधास्त घुसतात व आपल्या लोकांवर हल्ले करतात हे कसे? ते चळाचळा का कापत नाहीत? हा संशोधनाचा विषय आहे. सर्वपक्षीय बैठकीत हा प्रश्न एकाही विरोधी पक्षाच्या नेत्याने विचारला नाही. ते डळमळले व आता कश्मीरवरील चर्चेसाठी सगळय़ांना संसदेचे विशेष सत्र हवे आहे. देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांचा राजीनामा न मागणारे विरोधी पक्षाचे नेते एक दिवस लोकांच्या मनातून उतरतील. कश्मीरसारख्या घटनांचे राजकारण करू नये व अशा प्रसंगी सगळय़ांनी एक व्हावे हे बरोबर, पण किती वेळा एक व्हावे व सरकारच्या पाठीशी उभे रहावे? सरकारला लोकशाहीची फिकीर नाही व विरोधक राष्ट्रहिताच्या नावाखाली सरकारला पाठिंबा देतात. पहलगामनंतर देशभरातील कश्मिरी विद्यार्थ्यांना भाजपपुरस्कृत संघटनांनी जगणे नकोसे केले. त्यावर देशाचे गृहमंत्री बोलायला तयार नाहीत. कारण त्यांना या झगड्यास हिंदू-मुसलमान असा रंग द्यायचा आहे. सय्यद आदिल हुसेन हा तरुण हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवताना मरण पावला. त्याचा उल्लेख ना पंतप्रधानांनी केला, ना गृहमंत्र्यांनी. सरकारला पाकिस्तानबरोबर युद्ध नको आहे, तर या विषयावर गृहयुद्ध हवे हाच त्याचा अर्थ. हे बरोबर नाही. भाजप व त्यांचे चमचे पक्ष वगळून एक सर्वपक्षीय बैठक त्यासाठी होणे गरजेचे आहे, पण नेतृत्व कोणी करायचे?
अपयशी कोण?
पहलगाम प्रकरणात देशाची गुप्तचर व्यवस्था (इंटेलिजन्स) पूर्ण अपयशी ठरली. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्था यशस्वी ठरतात व सरकारला सहाय्यक भूमिका वठवतात, पण `इंटेलिजन्स’ अपयशी. पुन्हा त्यावर प्रश्न विचारायचे नाहीत. कश्मीरात ‘AFSPA’ लागू आहे. सर्व सुरक्षा केंद्र सरकार आणि सुरक्षा दलाच्या हाती. केंद्रशासित राज्य बनवल्यावर `राज्य सरकार’ची औकात नगरपालिकेइतकीही नाही. तरीही आपल्या राज्यात पडलेले पर्यटकांचे मुडदे आणि रक्ताचे सडे पाहून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भावनांचा बांध जम्मू-कश्मीरच्या विधानसभेत फुटला. “माझ्या राज्यात जे घडले त्यामुळे माझी मान शरमेने खाली गेली,” असे उद्गार ओमर अब्दुल्ला यांनी काढले. कश्मीरातील संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे `मालक’ गृहमंत्री अमित शहा आहेत. त्यांना जाब विचारणाऱयांना टीकेचा सामना करावा लागतो. राजदीप सरदेसाई यांचा प्रश्न सरळ होता, “पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली असताना पहलगाम, बैसरन येथे एकही पोलीस चौकी नाही? याची जबाबदारी नक्की कोणावर? Who is accountable?” यावर सरदेसाई यांनाच भाजप ‘ट्रोल धाडी’ने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांना ‘पाकिस्तानचे समर्थक’ ठरवले. “तुम्ही पाकिस्तानी मीडियाचीच भाषा बोलताय” असे सुनावले. देश संकटात असताना ‘सत्य’ बोलणे हा जेव्हा गुन्हा ठरतो, तेव्हा त्या देशाचे अध:पतन वेगाने सुरू होते. भाजपचे प्रचारक म्हणून काम करणाऱ्या एकाही बाबा आणि महाराजांना पहलगाम हल्ल्याची माहिती नसावी? नरेंद्र मोदी ज्यांना ‘छोटे भाई’ मानतात, त्या धीरेंद्र शास्त्रींचे चमत्कार आणि इंटेलिजन्स फेल गेले. ते अनेक प्रश्नांवर तोडगा देणाऱ्या चिठ्ठ्या काढतात, पण ‘दहशतवादी हल्ला होणार’ अशी चिठ्ठी त्यांनी काढली नाही. हे बाबा देवांशी थेट बोलतात, पण 26 निरपराध लोक मारले जाणार आहेत याबाबत त्यांना ‘आकाशा’त संवाद साधता आला नाही. हा वेगळाच चमत्कार आहे. भारत-पाक युद्ध प्रत्यक्ष सुरू होईल तेव्हा या सगळ्यांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जवानांचे शौर्य पाहायला पाठवायला हवे. युद्ध हा चमत्कार नसतो, तर बलिदानासाठी पुकारलेला महासंग्राम असतो. युद्ध प्रवचनांवर चालत नाही. ते शूरांच्या मनगटांवर चालते. अशा वेळी धर्मही मागे पडतो. धर्माच्या नावाने निर्माण झालेली अनेक राष्टे प्रत्यक्ष युद्धभूमीवर पराभूत झाली आहेत. बाजूचे पाकिस्तान हे त्याचे मोठे उदाहरण.
कोण कोठे?
युद्ध झालेच तर चीन आणि तुर्कस्तान हे देश उघडपणे पाकिस्तानला साथ देतील हे आता स्पष्ट दिसते. मोदी काळात एकही ‘शेजारी’ राष्ट्र भारताचा मित्र नाही. रशिया व युक्रेन युद्धाचा भडका उडेल व देश तिसऱ्या महायुद्धाकडे जाईल असे वाटत होते. ते झाले नाही. युक्रेन बेचिराख होत असताना त्यांना पाठिंबा देणारे एकही ‘नाटो’ राष्ट्र युक्रेनसाठी प्रत्यक्ष युद्धात उतरले नाही. चीनच्या सीमा ढिल्या आहेत. नेपाळ चीनने आधीच गिळले आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान या दोन आघाड्यांवर भारताला लढावे लागेल. पुन्हा मोदी व शहा यांना पाकिस्तानबरोबरचे युद्ध पेलता येईल काय? वल्गना करणे व डोकी भडकवणे सोपे. प्रत्यक्ष युद्ध होईल तेव्हा मोदी यांची कसोटी लागेल. मोदी यांना युद्धाआधी मंत्रिमंडळात अनेक मोठे फेरबदल करून नवे ‘सरकार’ निर्माण करावे लागेल. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत सुरक्षा अधिक संवेदनशील होते व त्यासाठी व्यापारी आणि कारस्थानी लोक पदावर असणे धोक्याचे आहे. पाकिस्तान कमजोर आहेच, पण आपल्या देशातील मानसिक स्थिती मजबूत आहे काय? हादेखील प्रश्न आहे. भारताने फ्रान्सकडून 63 हजार कोटींची 26 राफेल पहलगामनंतर विकत घेतली. 37 राफेल आधीच होती. त्यात नवी 26 आली. हे सर्व असतानाही 26 पर्यटकांना मारले जाते व जवानांचे सामुदायिक हत्याकांड घडते. देश दुखवट्यात असताना सरकारचे प्रमुख बिहारात जाऊन प्रचाराच्या सभा घेतात. महाराष्ट्रात येऊन सिनेमावर भाषणे झोडतात. सगळा आनंदच आहे. हे दुसरे कोणी केले असते तर भाजपने देशभरात त्या नेत्याचे पुतळे जाळले असते आणि राजीनामा मागण्यासाठी दिल्लीवर हल्लाबोल केला असता. भारतात चमत्कार वेगळाच आहे. समस्त विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी ठाम उभा आहे. राजीनामा मागण्याची बातच नाही.
हा लोकांचा आवाज नाही.
पाकिस्तानबरोबर युद्ध हवे, पण ते निर्णायक हवे. 26 राफेलची नव्याने खरेदी झाली! पुढचे पुढे.
युद्ध होईपर्यंत जात जनगणनेचा विषय चर्चेला टाकला आहे. तेसुद्धा युद्धच आहे!
Twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List