“आमच्या वेदनेची थट्टा करताय..”; पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या अतुल कुलकर्णींना अशोक पंडित यांनी सुनावलं
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काश्मीरच्या पर्यटनावर त्याचा मोठा परिणाम झाला. या हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर अभिनेते अतुल कुलकर्णी तिथे पोहोचत पर्यटकांना आवाहन केलं. मी काश्मीरला आलोय, तुम्हीसुद्धा या.. असा संदेश त्यांनी लोकांना दिला. यावर आता निर्माते अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक पंडित यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘जर तुला या अशांततेचा भाग व्हायचं असेल तर कृपया या प्रकरणाचा सखोल अभ्यास कर. अन्यथा पीडित म्हणून तुम्ही आमच्या वेदनेची थट्टा करताय असं वाटेल’, असं ते म्हणाले.
“आमच्या वेदनेची थट्टा करत आहात..”
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अशोक पंडित यांनी अतुल कुलकर्णी यांना उद्देशून लिहिलं, ‘प्रिय मित्रा, इस्लामिक जिहादमुळे काश्मीर त्रस्त आहे आणि आम्ही त्याचे सर्वाधिक पीडित आहोत. या इस्लामिक जिहादमुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. खोऱ्यातील पर्यटकांची संख्या हे काश्मीरमधील सामान्य वातावरणाचं मापदंड असू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर या अशांततेचा भाग व्हायचं असेल तर कृपया या प्रकरणाचा सखोल अभ्यास करा. अन्यथा पीडित म्हणून तुम्ही आमच्या वेदनेची थट्टा करत आहात असं वाटेल. सत्य हे आहे की हत्याकांड आणि आमचा नरसंहार हा धर्माच्या आधारावर झाला आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी हे स्वीकारणं सर्वांत महत्त्वाचं आहे. काश्मिरीयत हा शब्द एक विनोद आहे आणि इस्लामिक जिहादच्या समर्थकांनी त्यांचं दुष्कृत्य लपवण्यासाठी ढाल म्हणून वापरला आहे. पहलगामसह सर्व हल्ले आपल्या राष्ट्राविरुद्धच्या अघोषित युद्धाचा भाग आहेत.’
अतुल कुलकर्णी यांची काश्मीरला भेट
अशोक पंडित यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अतुल कुलकर्णी पत्रकाराला सांगतात, “इथले नव्वद टक्के बुकिंग्स रद्द करण्यात आले आहेत. तुम्ही काश्मीरला येऊ नका असा संदेश दहशतवाद्यांना द्यायचा आहे. पर्यटकांना ते हेच सांगू इच्छित आहेत. पण हे शक्य नाही. काश्मीर आपला आहे. हा आपला देश आहे. इथे आम्ही येणारच. आम्ही दहशतवाद्यांचं ऐकणार नाही. हेच उत्तर प्रत्येक भारतीयने द्यायचं आहे. हा संदेश मी मुंबईत बसून देऊ शकत नाही. म्हणून मी इथे आलोय.”
काय म्हणाले अशोक पंडित?
अतुल कुलकर्णी यांच्या या वक्तव्यावर अशोक पंडित म्हणाले, “अतुलजी, मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. मला तुमच्या हेतूंवर अजिबात शंका नाही, पण दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला काश्मिरी पंडित असल्याने मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करू इच्छितो. काश्मीरमधील परिस्थितीला पर्यटनाशी जुळवून घेता येणार नाही. आजपर्यंत तिथे जे काही दहशतवादी हल्ले झाले आहेत, त्याचे बळी नेहमीच काश्मिरी हिंदू राहिले आहेत. आम्ही सर्वजण आमच्याच देशात निर्वासित म्हणून राहत आहोत. तुम्हाला या सर्व गोष्टींची जाणीव असली पाहिजे.”
“पण मी तुम्हाला कधीच काश्मीरमध्ये येताना पाहिलं नाही. खरंतर आमचे बरेच लोक गेल्या 35 वर्षांपासून जम्मूमध्ये निर्वासित म्हणून छावण्यांमध्ये राहत आहेत आणि मी तुम्हाला कधीही इथं येताना किंवा त्याचा उल्लेख करताना पाहिलं नाही. माझं हे वक्तव्य तुमच्याविरोधात नाही. हे माझं दु:ख आहे आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की अचानक ही निवडक सक्रियता का? मला आशा आहे की तुम्ही वाईट वाटून घेणार नाही. पहलगाम हल्ल्यानंतरही, त्या लोकांनी हिंदूंना मारलं, त्यांना का मारलं किंवा इतर काही म्हटल्याचं मी वाचलं किंवा ऐकलं नाही. मला असं वाटतं की तुम्ही आता पुढे येऊन इस्लामिक जिहादविरुद्ध उघडपणे बोलायला हवं”, असा सल्ला त्यांनी अतुल कुलकर्णींना दिला.
याविषयी ते पुढे म्हणाले, “याआधी अमरनाथ, उरी किंवा पुलवामा इथं हल्ला झाला होता. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे काश्मीरला भेट दिली नव्हती. यावेळी इस्लामिक जिहाद उघडपणे समोर आलंय आणि मला असं वाटतं की लोकांनी पुढे येऊन याविषयी मोकळेपणे बोलावं. तुम्ही काश्मीरहून जम्मूला यावं आणि गेल्या 35 वर्षांपासून तिथे राहणाऱ्या अनेक हिंदू निर्वासितांना भेटावं”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List