सावंत बंधूंमध्ये वाद; शिंदेंची माढय़ातील कार्यक्रमाला दांडी
मिंधे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेले प्रा. शिवाजी सावंत आणि माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत या दोन भावांतील वाद उफाळून आल्याचे आज दिसून आले. त्यातच प्रा. शिवाजी सावंत यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे मिंधे गटात चर्चेचा विषय झाला असून, उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
माढय़ातील कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांचे नाव नसल्याने अगोदरच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. त्यातच शिंदे यांनीदेखील अचानक या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. मिंधे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत यांच्या ‘राजवी अॅग्रो’ कंपनीचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. तसेच शिंदेंच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या जाहिरातबाजीमध्ये आणि निमंत्रणपत्रिकेत माजी आरोग्यमंत्री, आमदार तानाजी सावंत यांचे नाव नसल्याने चर्चा सुरू होती. मात्र, या कार्यक्रमाला शिंदे यांनी अचानक दांडी मारली. त्यांच्याऐवजी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व उद्योगमंत्री उदय सामंत आले.
यापूर्वी प्रत्येक जाहिरातीत व कार्यक्रमात तानाजी सावंत यांना सहभागी करून घेणारे शिवाजी सावंत यांनी आज जाहिरात व कार्यक्रमपत्रिकेतून तानाजी सावंत यांना डच्चू दिल्याचे दिसत आहे. भूमिपूजन व शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला दोन मंत्री आले असताना माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांना कार्यक्रमातून वगळल्यामुळे कार्यक्रमस्थळी दोन बंधूंमधील वादाची चर्चा शेतकऱयांमध्ये सुरू होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List