गृह विभागाचा अजब कारभार, खेळाडूने स्वतः पैसे न भरल्याने रखडवला शस्त्र परवाना; हायकोर्टाने व्यक्त केला तीव्र संताप
महत्त्वाकांक्षी नेमबाजाने शस्त्र परवान्याचे पैसे स्वतः न भरल्याने त्याच्या अर्जावर निर्णय होत नाही, अशी सबब गृह विभागाने उच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. अशी फालतू कारणे देऊ नका, असे खडे बोल न्यायालयाने गृह विभागाला सुनावले.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. नेमबाजाने वकिलामार्फत शुल्क भरले. त्यावर गृह विभागाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्याच्या शस्त्र परवान्याच्या अपिलावर निर्णय होत नाही, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली. यावर न्यायालयाने गृह विभागाला चांगलेच फैलावर घेतले. पैसे कोणी भरले हे महत्त्वाचे नाही. पैसे भरले गेले हे महत्त्वाचे आहे. या अर्जावर दहा दिवसांत निर्णय घ्या, असे आदेश न्यायालयाने गृह विभागाला दिले.
काय आहे प्रकरण
अनेक राष्ट्रीय व राज्य स्पर्धांमध्ये भाग घेणाऱया स्वप्नील पाठारे या नेमबाजाला सरावसाठी शॉटगनची आवश्यकता आहे. 12 शॉटगन बाळगण्याचा त्याच्याकडे परवाना आहे. सध्या त्याला नवीन दोन शॉटगन घ्यायच्या आहेत. यासाठी त्याने पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मागितला. मार्च महिन्यात त्याचा अर्ज पोलिसांनी नामंजूर केला. जुलै महिन्यात त्याने गृह विभागाकडे अपील केले. या अपिलावर निर्णय होत नसल्याने स्वप्नीलने याचिका दाखल केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List