पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा भूखंड घोटाळा, शीतल तेजवानींची सलग सहा तास पोलीस चौकशी
मुंढव्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवानी यांची पुणे पोलिसांनी गुरुवारी सलग सहा तास चौकशी केली. तेजवानी यांनी महार वतनाच्या व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेतलेली कागदपत्रे तसेच अमेडिया कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. त्यांना उद्याही चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंढवा जमीन महार वतनाची असून 2006मध्ये शीतल तेजवानी यांनी 275 व्यक्तींकडून ही जमीन पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेतली. नंतर 2025मध्ये ही जमीन त्यांनी अमेडिया कंपनीसोबत करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचादेखील प्रयत्न झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसारच पुणे पोलीस आता नेमका जमीन व्यवहार कसा झाला या अनुषंगाने तपास करत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणातील सूर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीला बोलावले होते. हेमंत गवंडे यांची चौकशी झाली. बुधवारपासून शीतल तेजवानींची पोलिसांकडे चौकशी सुरू आहे. गुरुवारी पोलिसांनी सलग सहा तास त्यांची चौकशी केली. संबंधित व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेताना त्यांना काय मोबदला दिला का, कशाच्या आधारावर पॉवर ऑफ अॅटर्नी केली, अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार कशा पद्धतीने झाला, याअनुषंगाने ही चौकशी झाली तसेच सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
लिहून देणाऱयांना जबाबासाठी बोलवले
शीतल तेजवानी यांना तब्बल 275 व्यक्तींनी पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. काही चार व्यक्तींमध्ये एकत्रित कागदपत्रे केली आहेत, तर काहींची वैयक्तिकदेखील आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्या सर्व व्यक्तींनाही शुक्रवारी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्या जबाबानंतर अनेक गोष्टींचा उलघडा होईल, असे पोलीस सांगत आहेत. नेमका या व्यक्तींना मोबदला काय भेटला, हे अद्याप समोर आले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List