सुर्वे स्मृती क्रिकेट उद्यापासून
ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खेळवण्यात येणाऱ्या 16 वर्षे वयोगटातील चार संघांचा समावेश असलेल्या दुसऱया दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेला 21 नोव्हेंबरपासून ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत रंगणाऱया या स्पर्धेतील खेळाडूंची निवड चाचणी 15 नोव्हेंबर रोजी सेंट्रल मैदानावर पार पडली.
‘बाबा’ या टोपणनावाने मुंबई ठाण्यातील क्रिकेट वर्तुळात परिचित असणाऱया तुकाराम सुर्वे यांनी स्थानिक क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा खेळवताना ज्युनिअर गटातील स्थानिक क्रिकेटपटूंना वरच्या पातळीवर खेळण्याची संधी कशी मिळेल याचा विचार केला. या स्पर्धेकरिता तुकाराम सुर्वे यांचे समकालीन अनंत धामणे, गोविंद पाटील, सदाभाऊ सातघरे आणि गणाभाऊ भुवड यांच्या नावाने चार संघ खेळतील. परेश नाखवा, किरण साळगावकर, दर्शन भोईर आणि संग्राम शिर्पे या संघाचे प्रशिक्षक असतील. चार संघांच्या प्रत्येकी सोळा खेळाडूंच्या निवड चाचणीत 16 वर्षे वयोगटाचे जिह्यातील सुमारे चारशे युवा क्रिकेटपटू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List