चित्र खूप भयानक आहे, आधीच अस्मानी संकटाने कंबरडं मोडलंय त्यात… प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप
          पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड गावात रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांवर प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे याने संताप व्यक्त करत यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच जर यावर तोडगा काढला नाही तर लोकांच्या सहनशक्तीचा अंत होईल व लोक कायदा हातात घेतील, असा इशाराही दिला आहे.
”पुन्हा एक हल्ला आणि अजून एक चिमूरडा मृत्युमुखी, माझ्या पिंपरखेड गावात अजून एक बळी गेला. लहानगा रोहन बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात दगावला. सरकारकडे पुन्हा एकदा मागणी आहे की लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. आज जमावाने कायदा हातात घेतला आहे, गेल्या काही दिवसात माझ्या भागात ११ मृत्यू झाले आहेत. चित्र खूप भायानक आहे, प्रचंड भिती आहे. पशूधनाची तर यात मोजणी सुद्धा झालेली नाही. आधीच अस्मानी संकटाने कंबरडं मोडलंय त्यात हे जंगली संकट! आता सहनशक्तीचा अंत होणार, लोक कायदा हातात घेणार यापेक्षा human-wildlife conflict वर sustainable उपाययोजना आणि कायदे आखण्यात यावेत… जनजागृती व्हावी, असे हेमंतने ट्विट केले आहे.
”मागेच जवळपास २० वर्षांपूर्वी याबाबतीत विद्या अथ्रेया यांनी प्रचंड काम केलं आहे त्याकडेही डोळेझाक झाली आहे… आपण जंगलात घुसलो आहोत हे बरोबर आहे पण जंगलापासून दूर राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा त्रास भोगावा लागत आहे… जंगल संपवणाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे शेती करणाऱ्या भुमीमालकांचं जगणं कठीण झालंय. हे आहेत माझ्याच शेतातले आजचे ताजे ठसे . एक अमोल कोल्हे सोडल्यास आमचे बाकीचे लोकप्रतिनिधी मात्र कशात मशगुल आहेत कोणास ठाऊक??? असा संतप्त सवाल देखील त्याने केला आहे.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List