शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जूनचा मुहूर्त कोणत्या पंचांगातून काढला? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
          मराठवाडय़ातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असताना राज्य सरकारने त्यासाठी 30 जूनची तारीख दिली आहे. 30 जून हा नेमका कोणता मुहूर्त आहे? मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पंचांगातून हा मुहूर्त काढला, असा रोकडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे हे 5 नोव्हेंबरपासून पुन्हा मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ’मातोश्री’ निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ’अतिवृष्टीनंतर आता केंद्राचे पाहणी पथक येणार आहे. त्यांचा हा दौरा दोन-तीन दिवसांचा आहे. एवढया कमी वेळेत मराठवाडयासह महाराष्ट्राचा दौरा ते कसा करणार, ते कुठे जाणार आणि ते कधी प्रस्ताव पाठवणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
यांच्या संवेदना कधीच मेलेल्या आहेत!
कर्जमाफी मागण्याची सवय चांगली नाही, असे शेतकयांना सुनावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुनावले. ’ह्यांच्या संवेदना कधीच मेलेल्या आहेत. निर्ढावलेपणा हा शब्दही यांच्यासाठी कमी आहे. दगडाला पाझर फुटू शकतो, पण यांना फुटत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आता लोकांनीच त्यांना जाब विचारला पाहिजे. लोकांनी त्यांना खरेच मते दिली असतील तर त्यांनी आता त्या मताला जागले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तोपर्यंत कर्जाचे हप्ते फेडायचे की नाहीत?
तातडीने कर्जमुक्ती कशी होऊ शकते हे आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखवून दिले आहे. यंत्रणा तीच आहे. आकडेवारी आहे. त्या आधारे आताचे सरकार कर्जमुक्ती का देत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी 30 जूनचा वायदा दिला असेल तर आता डोक्यावर असलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे की नाही भरायचे? रब्बीच्या हंगामासाठी कर्ज कसे मिळणार आणि ते मिळाले तर त्याचे हप्ते भरायचे का, अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली. आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल, असे मुख्यमंत्री म्हणतात, मग जूनमध्ये केली तर बँकांचा फायदा कसा होणार नाही, हे कोणते गणित आहे. याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List