कल्याण पूर्वेच्या यादीत दुबार, बोगस मतदार; शिवसेनेने निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले
          कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नावे आणि दुबार नोंदी आहेत. मतदार याद्यांतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे तसेच महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.
कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्या पारदर्शक नसून त्यात अनेक बोगस आणि मृत मतदारांची नावे आहेत. काही मतदार स्थलांतरित असून त्यांची नावे अद्यापही जुने पत्ते असलेल्या यादीत आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुबार नोंदी आहेत. बीएलओच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करून याद्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, सहसंपर्कप्रमुख रमेश जाधव, विधानसभा
 संपर्कप्रमुख नारायण पाटील, शहरप्रमुख शरद पाटील, उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील, प्रकाश जाधव, शांताराम गुळे, नितीन मोकल, संगीता गांधी, युवासेनेचे शहर युवाधिकारी अॅड. नीरज कुमार, अशोक म्हात्रे, वैष्णवी सोनावणे, पुरुषोत्तम चव्हाण, किरण निचळ, अरुण निंबाळकर, नितेश सावंत, अभय देसाई, प्रमोद परब, देवेंद्र प्रसाद, अमित उगले, संदीप पावशे, सूर्यकांता मोरे, अशोक पडांगळे, राजेंद्र गायकवाड, संध्या पाचंगे आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव
काही कर्मचारी सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून त्यांच्या सांगण्यावरून मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हलवली जात आहेत. ही गंभीर बाब आहे. मृत मतदार, दुबार नोंदणी आणि स्थलांतरित मतदार यांची नावे तातडीने वगळावीत. जर बोगस मतदार आढळले तर त्यांना शिवसेना स्टाईल हिसका दाखवला जाईल, असा इशारा कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला.
मतदान टक्केवारीची घट थांबवा
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 146 आणि 147 चे मतदान पूर्वी जाईबाई शाळेत होते. परंतु 2024 साली केंद्र विश्वास विद्यालयात हलवले. विश्वास विद्यालय हे केंद्र जाईबाई शाळेच्या मतदारांसाठी लांब असल्याने मतदान टक्केवारीत घट होत आहे. त्यामुळे जाईबाई शाळेतच मतदान केंद्र ठेवावे, अशी मागणी कल्याण लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख रमेश जाधव यांनी केली.
कल्याण पूर्व मतदारसंघात 18 हजार नवीन नावे नोंद झाली आहेत. बोगस किंवा दुबार मतदारांबाबत आलेल्या तक्रारी आणि सूचनांची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. आवश्यक सुधारणा करून अद्ययावत याद्या तयार केल्या जातील.
 – डॉ. स्वाती घोंगडे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी.
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List