ट्रेनमध्ये ब्लॅंकेटवरून वाद, रागाच्या भरात अटेंडंटने केलेल्या चाकूहल्ल्यात जवानाचा मृत्यू
पंजाबवरून गुजरातला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली. येथे एका ब्लॅंकेटवरून वाद झाला आणि या वादाचे रुपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका जवानाने तेथील एसी कोचच्या सहाय्यकाकडे ब्लॅंकेट मागितले आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की एसी कोचच्या सहाय्यकाने रागात येऊन जवानावर चाकूने वार केला. यामुळे जवान गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, अतिरक्तस्त्राव झाल्याने जवानाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीला आरपीएफच्या टीमने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी रात्री घडली. गुजरातमधील साबरमती येथील रहिवासी असलेले जवान जिगर कुमार हे पंजाबमधील फिरोजपूर कॅन्ट येथून ट्रेनमध्ये प्रवास करत होते. यावेळी ते स्लीपर कोचमध्ये प्रवास करत होते. मात्र मध्यरात्री त्यांना थोडी थंडी वाजू लागली. त्यामुळे ते एसी कोचमध्ये ब्लँकेट मागण्यासाठी गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी एसी कोच अटेंडंट झुबेर मेनन याच्याकडे ब्लँकेट मागितले. मात्र त्याने ब्लँकेट देण्यास नकार दिला.
हे फक्त एसी कोचमधील प्रवाशांसाठी आहे, झुबेरने जवानाला सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की यातून त्या जवानाला आपला जीव गमवावा लागला. बिकानेरमधील लंकरनसर येथून ट्रेन निघाल्यानंतर झुबेरने जवान जिगरवर चाकूने हल्ला केला. यामुळे यात जिगर यांना गंभीर दुखापत झाली. चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जिगर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, ट्रेन बिकानेरमध्ये आल्यानंतर सर्व कोच अटेंडंटना उतरवून चौकशी करण्यात आली. अखेर झुबेरला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List