सामना अग्रलेख – पुण्यातील गँगवॉर… कोयत्याला धार, गृहखाते गार!
          आंदेकर व कोमकर यांच्यात पेटलेल्या टोळी युद्धाने पुण्यात खुनांची मालिकाच सुरू झाली आहे. दोन्ही टोळ्यांतील बहुतांश गुंड मकोकाखाली तुरुंगात असतानाही पुण्याच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या हत्या घडवल्या जात आहेत. सांस्कृतिक पुण्यातील विकृती वाढत चालली आहे. ‘आयटी हब’ असलेले पुणे आता ‘मर्डर हब’ बनले आहे. ‘गँगवॉर’मधून मुडदे पाडत सुटलेल्या गुंडांच्या कोयत्यांना धार चढली असताना गृहखाते व पोलिसांची धार मात्र बोथट झाली आहे. गणेश काळेच्या निर्घृण हत्येने हेच सिद्ध केले आहे!
पुण्याने आता हादरणे सोडून दिले आहे. अलीकडच्या काळात इतक्या गुन्हेगारी घटनांचे आघात पुण्यावर होत आहेत की, ‘खून’, ‘मारामाऱ्या’, ‘टोळी युद्ध’, ‘कोयता गँग’ वगैरे शब्दांना आता पुणेकर सरावले आहेत. एका घटनेतून सुन्न होऊन स्थिरस्थावर होत असतानाच पुन्हा दुसरी त्यापेक्षा धक्कादायक घटना पुण्यात घडलेली असते. पुणे परिसरात वाढलेले गुन्हेगारीचे प्रकार पाहता सिनेमातील थरारक प्रसंगही फिके पडतील. कोंढवा येथे शनिवारी भरदिवसा 22-23 वर्षांच्या पोरांनी गणेश काळे या तरुणाची क्रूरपणे हत्या केली. मारेकऱ्यांनी आधी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या घातल्या आणि नंतर डोक्यावर व चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारले. पुण्यातील बहुचर्चित आंदेकर व कोमकर यांच्यातील टोळी युद्धातून ही हत्या करण्यात आली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या एक वर्षापूर्वी झालेल्या खून प्रकरणापासून या दोन्ही टोळ्या सुडाने पेटल्या आहेत व त्यातूनच कधीकाळी मुंबईत भडकलेल्या गँगवॉरप्रमाणे पुण्यात टोळी युद्ध भडकले आहे. शनिवारी ज्या गणेश काळेची हत्या झाली, तो वनराज आंदेकर याच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. रिक्षाचालक असलेला गणेश कोंढव्यातील अत्यंत गजबजलेल्या खडी मशीन चौकात पेट्रोल पंपाजवळ थांबलेला होता. चौकात प्रचंड गर्दी असतानाही टोळीने आलेले हल्लेखोर जराही कचरले नाहीत. याला म्हणतात पुणे पोलिसांचा ‘वचक’! टोळी युद्धातील खुनी खेळाची ही पहिलीच घटना नाही. याआधी वनराज आंदेकरच्याच हत्येचा बदला घेण्यासाठी गुंडांनी आयुष कोमकर या महाविद्यालयीन तरुणाचा खून केला. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठसारख्या भरवस्तीत आंदेकरच्या खुनाचा आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुषलादेखील असेच गोळ्या घालून संपविण्यात आले. टोळी युद्धातून
बदला घेण्यासाठी
आयुषची हत्या झाली, असे तेव्हा पोलिसांनी सांगितले व आता गणेश काळे हत्या प्रकरणातही पोलिसांना टोळी युद्धाचाच संशय आहे. पुण्यावर गुंड टोळ्यांचे राज्य सुरू असेल तर पोलीस नेमके काय करीत आहेत? नाना पेठेत कोमकरच्या घरासमोरच एक खास गाणे डीजेवर मोठय़ाने लावून आयुषवर गोळ्या झाडण्यात आल्या. पुण्याची पोलीस यंत्रणा किती कुचकामी व हतबल बनली आहे, हेच या हत्याकांडातून दिसते. या घटना गुन्हेगारी टोळ्यांच्या आपापसातील वैरातून घडत आहेत, असे म्हणत पोलीस हात झटकून मोकळे होऊ शकत नाहीत. गेल्या 11 महिन्यांत पुण्यात गोळीबाराच्या 14 घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात छत्र्या काढाव्यात इतक्या सहजपणे रस्त्यावर कोयते काढले जातात. कोथरूडमध्ये मंत्र्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला दुचाकी अडवून मारणे टोळीकडून मारहाण केली जाते. गाडीला रस्ता न दिल्याच्या रागातून कुख्यात गुंड नीलेश घायवळची टोळी तरुणावर गोळीबार करते. कधीकाळी शांत व सुसंस्कृत शहर असा लौकिक असलेल्या पुण्यातील ही गुंडागर्दी आणि कोयता गँगची दहशत राज्याच्या गृहखात्यासाठी लांच्छनास्पद आहे. वाहन चालवतानाच काय, साधे चालतानाही पुणेकर हल्ली दहशतीखालीच असतात. चुकून कुणाला धक्का लागला तरी कुणी झटकन कोयता काढून डोक्यात वार करेल, अशी भीती लोकांना वाटते. उपनगरातील कित्येक भागांत दहशत माजवण्यासाठी कोयते नाचवत टोळय़ा रस्त्यावर फिरतात. सोसायटय़ांच्या आवारातील दुचाकी जाळल्या जातात, तर दुचाकीवरून जाताना श्रीमंत बापाच्या लाडावलेल्या पोराची पोर्शे कार कधी चिरडून जाईल याचा नेम नसतो. महिलांवरील अत्याचारही पुण्यात वाढीस लागले आहेत. स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवरील अत्याचार, दिवे घाटातील सामूहिक बलात्कार, कोंढव्यात तरुणीवरील अत्याचार प्रकरण लोकभावनेचा
उद्रेक करणारे
होते. कोयता गँग, बलात्कार, टोळी युद्धाने पुणे हादरत असतानाच शहरात दहशतवादी सापडण्याच्या घटनाही घडत आहेत. कधीकाळी सामाजिक चळवळींचे केंद्र असलेल्या पुण्यातील सार्वजनिक वातावरण इतके थरकाप उडवणारे का बनले आहे? गुन्हेगारी प्रवृत्ती इतक्या बेडर का झाल्या आहेत? पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नेहमीच जाहीर भाषणांतून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा, असे पोलिसांना बजावतात. मग तो टायर अजून पोलिसांना सापडलेला नाही की गृहखाते मुख्यमंत्री फडणवीसांकडे असल्यामुळे अजितदादांचा टायर पंक्चर होत असतो ते देवाला व ‘देवाभाऊं’नाच ठाऊक! पुण्यातील लोकप्रतिनिधी-राजकारणी आणि डॉन म्हणविल्या जाणाऱ्या गुन्हेगारांच्या भेटीगाठी व त्यांचे उघड उघड झालेले सत्कार पुणेकरांना पाहायला मिळतात. गुन्हेगारांच्या आदर-सत्कारांतून पुण्याच्या कारभाऱ्यांना कुठले समाजहित साधायचे असेल? असा प्रश्न पडतो. पुण्यातील राजकीय नेत्यांची गुन्हेगारी टोळीशी असलेली ही जवळीक चौकाचौकांतील होर्डिंग्जमधूनही डोकावत असते. राज्यकर्त्यांचेच गुन्हेगारांशी असे साटेलोटे असल्यावर पोलीस व गृहखात्याचा तरी गुन्हेगारांवर वचक कसा राहणार? पुण्यातील पोलिसिंगचे धिंडवडे थांबवायचे असतील तर नाकाबंदीसारखे तात्पुरते इलाज करून चालणार नाहीत. पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावले उचलावी लागतील. पुण्यातील गुन्हेगारीबद्दल खडान्खडा माहिती असणाऱ्या अधिकाऱयांना सक्रिय करावे लागेल. पोलीस दलातील शिथिलतेमुळे पुण्यातीलच नव्हे तर राज्यातील गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. हे चांगल्या सुव्यवस्थेचे लक्षण नाही. आंदेकर व कोमकर यांच्यात पेटलेल्या टोळी युद्धाने पुण्यात खुनांची मालिकाच सुरू झाली आहे. दोन्ही टोळ्यांतील बहुतांश गुंड मकोकाखाली तुरुंगात असतानाही पुण्याच्या रस्त्यावर दिवसाढवळय़ा हत्या घडवल्या जात आहेत. सांस्कृतिक पुण्यातील विकृती वाढत चालली आहे. ‘आयटी हब’ असलेले पुणे आता ‘मर्डर हब’ बनले आहे. ‘गँगवॉर’मधून मुडदे पाडत सुटलेल्या गुंडांच्या कोयत्यांना धार चढली असताना गृहखाते व पोलिसांची धार मात्र बोथट झाली आहे. गणेश काळेच्या निर्घृण हत्येने हेच सिद्ध केले आहे!
About The Author
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
         
         
         
         
                
                
                
                
                
                
               
Comment List