लक्ष्मी आणि गणेशाचे नाते काय, लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीसह गणेशाची पूजा का करतात?…जाणून घ्या कथा…
>> योगेश जोशी
आपल्या संस्कृतीत दिवाळी सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीसह गणेशाचे पूजन केले जाते. मात्र, लक्ष्मी देवी आणि श्री गणेशाचे नेमके नाते काय आहे. इतरवेळी देवी लक्ष्मीसह श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीगणेशाचे पूजन का केले जाते? यामागे काय कराणे आहेत? तसेच यामागची कथा जाणून घेऊ या…
देवी लक्ष्मी ही धन, संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. तर श्री गणेश हे बुद्धी, विवेक यांचे अधिपती असून विघ्नहर्ता आहेत. केवळ धन (लक्ष्मी) असून उपयोग नाही, ते योग्य प्रकारे वापरण्यासाठी आणि त्याचा अहंकार न होण्यासाठी बुद्धी आणि विवेकाची गरज असते. त्यामुळे दिवाळीच्या पर्वात श्रीलक्ष्मी आणि गणेशाचे पूजन करण्याची गरज आहे. संपत्तीचा सुज्ञपणे वापर करता यावा आणि जीवन संतुलित राहावे यासाठी दोघांची एकत्र पूजा केली जाते.
एका पौराणिक कथेनुसार, माता लक्ष्मीला स्वतःच्या संपत्तीचा गर्व झाला होता. तेव्हा भगवान विष्णूंनी तिचा गर्व दूर करण्यासाठी सांगितले की, संततीशिवाय स्त्री अपूर्ण असते आणि संततीच तिच्या धनाचा योग्य वापर करू शकते. त्यानंतर लक्ष्मीने माता पार्वतीकडून गणेशजींना दत्तक घेतले. गणेशाला दत्तक घेतल्यावर लक्ष्मीने आशीर्वाद दिला की, जिथे-जिथे तिची पूजा केली जाईल, तिथे-तिथे सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाईल आणि गणेशाच्या पूजेशिवाय तिची अपूर्ण मानली जाईल. म्हणून दिवाळीत केल्या जाणाऱ्या लक्ष्मीपूजनला देवी लक्ष्मीसोबत गणेशजींची पूजा करणे आवश्यक मानले जाते. यामुळे घरात केवळ धन-संपत्तीच नव्हे, तर बुद्धी, विवेक आणि यश देखील प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
पौरणिक कथेनुसार, श्रीविष्णू देवशयनी एकादशीपासून चार महिने योगनिद्रेत असतात. त्या काळात लक्ष्मी आपल्या मानसपुत्रासह म्हणजे गणेशासोबत पृथ्वीवर येते, अशी मान्यता आहे. दिवाळी सण देवशयनी ते देवउत्थापिनी एकादशीदरम्यान येतो. त्यामुळे याकाळात महाविष्णू योगनिद्रेत असतात. त्यामुळे देवी लक्ष्मी श्री गणेशासह पृथ्वीवर येतात. तसेच सर्व पूजांमध्ये अग्रपूजेचा मान श्रीगणेशाचा असतो. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीलक्ष्मीसह गणेशाची पूजा केली जाते.
आणखी एक कथेनुसार, लक्ष्मी ही धनसंपत्ती, सौभाग्य देणारी देवी आहे. तर कुबेर हे देवांचे धनरक्षक म्हणज खजीनदार आहेत. कुबेर हे देवांचे धनरक्षक असल्याने ते धनाचा संचय करत होते. लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भक्तांना कुबेर धनसंपत्ती देत नव्हते. याबाबत भक्तांची नाराजी देवी लक्ष्मीपर्यंत पोहचवण्यात आली. यावर काय उपाय करावा म्हणजे माझे साधक संपत्तीवान होतील, असे श्री लक्ष्मीने महाविष्णूला विचारले. त्यावेळी महाविष्णू म्हणाले की, कुबेराच्या जागी तुम्ही श्रीगणेशाची नेमणूक करावी. यावर श्री लक्ष्मी म्हणाल्या, कुबेरही माझा भक्त आहे, असे केल्यास कुबेर नाराज होतील. त्यावर महाविष्णू म्हणाले की, कुबेर हे खजीनदार असतील तर श्रीगणेश धनाचे आणि संपत्तीचे वाटप तुमच्या भक्तांना करतील, असा उपाय महाविष्णूंनी सांगितला.
महाविष्णूने सांगितल्याप्रमाणे, श्रीलक्ष्मीने कुबेर यांना धनरक्षक म्हणजेच खजीनदार नेमले तर धनसंपत्तीच वाटप करण्याची जबाबदारी श्रीगणेशावर सोपवली. त्यानंतर भगवान गणेश बुद्धी, विवेक आणि भाविकांच्या भक्तीप्रमाणे धनसंपत्तीचे वाटप करू लागले. त्यामुळे लक्ष्मीचे भाविकही प्रसन्न झाले. त्यामुळे धनसंपत्ती मिळण्यासाठी दिवाळीत देवी लक्ष्मीसह श्रीगणेश आणि कुबेराची पूजन करण्याची प्रथा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List