घायवळच्या भावाला योगेश कदम यांनी दिला शस्त्रपरवाना
पुण्यातील कुख्यात नीलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन स्वित्झर्लंडला फरार झाला आहे. त्यातच पुणे पोलिसांनी नकार दिलेला असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने नीलेश याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पडताळणीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याचे म्हटले आहे.
गुंड नीलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन याने व्यावसायिक कारण देत पुणे पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र सचिन घायवळ याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने पुणे पोलिसांनी 20 जानेवारी 2025 रोजी त्याचा शस्त्र परवान्याचा अर्ज नाकारला होता. याविरोधात सचिन याने मार्च महिन्यात गृहखात्याकडे अपिल केले होते. त्यावर सुनावणी घेऊन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.
पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यावर सचिन घायवळ याने गृहमंत्रालयाकडे केलेल्या अर्जावर एप्रिल महिन्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत अपिलार्थीचा अपील अर्ज मंजूर करण्यात येऊन जून महिन्यात त्याला शस्त्र परवाना देण्यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत.
गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशात काय?
- शस्त्र परवान्यासाठी अपिलार्थीने दाखल केलेला अपील अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
- पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात येत आहे.
- पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अपिलार्थी यांना विहीत कार्यपद्धती अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List