स्वरांची आतषबाजी आणि नृत्याचा झंकार, गोदावरी किनाऱ्यावरील सांस्कृतिक सूरमंचावर ‘दिवाळी पहाट’चा अद्भुत संगम
गोदावरीच्या तीरावरच्या मंद वाऱ्यात, सूर आणि तालाच्या लहरींनी नांदेडकरांच्या मनात दिवाळीचा नवा उजेड फुलवला. जिल्हा प्रशासन, सचखंड गुरुद्वारा बोर्ड, नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट – स्वरसरीता आणि डॉ. सान्वी जेठवाणी निर्मित सांज झंकार’ या सांस्कृतिक पर्वाने नांदेडच्या परंपरेला नव्या तेजाने उजाळा दिला. हा तेराव्या वर्षीचा सोहळा जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. यंदा त्यात नव्या कलात्मक प्रयोगांची फुलबाग फुलली आहे.
कवी बापू दासरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या फ्युजन ऑफ तालवाद्य आणि गझल या अनोख्या प्रयोगाने संगीतप्रेमींना एक अद्वितीय अनुभव दिला. कार्यक्रमाची सुरुवात बासरीवादक ऐनोद्दीन आणि त्यांच्या शिष्य परिवाराच्या सामूहिक बासरीवादनाने झाली. त्यानंतर सार्क परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. गुंजन शिरभाते यांनी राग देशमधील मनोहारी करामती पेश केल्या. त्यांना तबल्यावर भार्गव देशमुख यांनी सुंदर साथ दिली.
यानंतर राग यमनमध्ये मिलिंद तुळणकर यांनी जलतरंगावर बंदिश सादर करत श्रोत्यांना थक्क केले. त्याच रागातील गझल ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आही’ ही बाळासाहेब पाटील यांच्या सुमधुर आवाजात रंगली. त्यांच्या साथीला प्रकाश सोनकांबळे (तबला), चिन्मय स्वामी (सिंथ), ऐनोद्दीन (बासरी) आणि अनहद वारसी (गिटार) यांनी स्वरांची जादू विणली.
राग चंद्रकंसमध्ये ऐनोद्दीन यांच्या बासरीनंतर आसावरी रवंदे जोशी यांनी बापू दासरींची ‘कवितेच्या गावामधल्या शब्दांची गाणी व्हावी’ ही गझल सादर केली. पुढे राग झिंजोटीत सतारवादक कल्याणी देशपांडे आणि राग चारुकेशीमध्ये जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांच्या सादरीकरणांनी कार्यक्रमात स्वरवैविध्य निर्माण केले.
शेवटी राग बिहागमधील कल्याणी देशपांडे यांच्या सुरांनी सभागृहात माधुर्य भरले, तर त्याच रागातील ‘सलोनासा सजन है और मैं हूँ’ ही गझल आसावरी जोशी यांच्या आवाजात भावविवश करून गेली. सूत्रसंचालन आणि शेरोशायरीच्या झंकाराने बापू दासरी यांनी संपूर्ण सादरीकरणाची मनमोहक गुंफण केली.
संध्याकाळी ‘लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य झंकारने दिवाळीच्या रंगतिला भरघोस सौंदर्य दिले. पहल राठी आणि आराध्या पोईल यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर मंगळागौर, श्रीराम स्तुती, महालक्ष्मी अष्टकम या नृत्यरचना – कथ्थक व भरतनाट्यमच्या सुंदर संगमातून – प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List