पाणी रोखले, सीमा बंद केल्या, मग क्रिकेट खेळलो नसतो तर काय बिघडले असते?
‘पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचे व्यापार थांबवले, पाणी रोखले, सीमा बंद केल्या, मग पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नसतो तर काय फरक पडला असता? उलट यातून पाकिस्तानलाच पैसे मिळाले. क्रिकेट सामना जिंकल्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘ऑपरेशन सिंदूर-३.०’ असे म्हणत आहेत. परंतु शहीद झालेल्यांची तुलना क्रिकेट सामन्याशी करता येईल का?’ असा संतप्त सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ‘पाकिस्तानचे शेपूट हे कुत्र्यासारखे वाकडे ते वाकडेच राहणार आहे. त्यांच्यापासून आपल्याला कायम सतर्कच राहावे लागेल,’ असेही त्यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. ओवैसी म्हणाले, ‘सध्या बांगलादेशात ‘आयएसआय’ येऊन बसली आहे. चीननेही त्यांच्या सीमाभागात कामे सुरू केली आहेत. आपल्याला सर्वाधिक धोका हा पाकिस्तानकडून असून, तो कायम राहणार आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेबद्दल सध्या भाजपकडे कोणतेच उत्तर नाही. देशातील युवकांना व्यवस्थित शिक्षण आणि नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यांना पेपरफुटीसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचार वाढला आहे. श्रीमंत हे श्रीमंत होत चालले आहेत, तर गरीब हे गरीब होत चालले आहेत.’
‘हिंदुस्थानातील मुस्लिमांची संख्या कधीही हिंदूंपेक्षा अधिक होणार नाही. मुस्लिम समाजातील जन्मदर पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मुस्लिम वस्त्यांमध्ये सरकारी शाळांची कमतरता असून, शाळेतील ‘ड्रॉपअप’ कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. उलट दबाव आणून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. दर्यावर चादर चढवल्याने किंवा शिरखुर्मा पिऊन एक आहोत, हे दाखवणे याचा उपयोग नाही. मुस्लिमांना ‘हिंदुस्थानी’ म्हणून वागणूक मिळाल्याशिवाय आपला देश विश्वगुरू होणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List