पुणे जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले; प्रशासन सतर्क
सतत सुरू असलेला पाऊस, ठिकठिकाणी साचलेले पाणी यांमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे पावले उचलण्यात येत असून, नगरपालिका, ग्रामपंचायत कर्मचारी घरोघरी जाऊन डासोत्पत्तीच्या ठिकाणांची पाहणी करीत असून, डासोत्पत्तीची केंद्रे नष्ट करण्याबरोबर स्वच्छ पाणी साचू न देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतली असल्याने अनेक भागांतील पूरस्थिती नियंत्रणात आली असून, पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाणी साठण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. तसेच सर्दी, खोकला, तापाने लहान मुलांना ग्रासले असून, ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे.
डेंग्यूचे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वच्छ पाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत डेंग्यू, मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागील आहे.
काय आहेत डेंग्यूची लक्षणे?
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलटी, तीव्र अंगदुखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये वेदना, अंगावर लाल पुरळ येणे, तीव्र पोटदुखी.
काय घ्याल काळजी?
घरामध्ये असलेले स्वच्छ पाण्याचे साठे झाकून ठेवावे. फ्रिज, एअर कुलर, फुलदाणी, पाण्याची टाकी, कुंड्या, पत्र्याचे डबे यांमध्ये पाच दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठू देऊ नये. घराबाहेर असलेल्या रिकाम्या साहित्यामध्ये पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. गच्चीवर किंवा घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाक्यांची झाकणे ही सुस्थितीत आहेत का, याची खात्री करून ती गच्च लावावी. पाणी साठवण्याचे साहित्य वेळोवेळी धुऊन स्वच्छ ठेवावे.
प्रशासनाकडून खबरदारी
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यू, मलेरियाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आले. नगरपालिका, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावामध्ये घरोघरी जाऊन डास उत्पत्तीस पोषक अशी ठिकाणे आहेत का, याची पाहणी करीत आहेत. तसेच ही उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करीत आहेत. नगरपालिका कर्मचारी शहरी भागात जाऊन पाहणी करीत असून, पाणी साठवणीसाठी असलेल्या टाक्यांचे फोटो काढून घेत आहेत. ग्रामीण भागात स्वच्छ पाण्याच्या विहिरी, शेततळे यांच्यामध्ये ग्रामपंचायतीतर्फे औषध टाकण्याचे कामदेखील करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List