शेतकऱ्यांचा चक्काजाम; ‘कर्जमुक्ती’साठी एल्गार!
निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना कर्जमुक्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बळीराजा आणि सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झालाय. या जगाचा पोशिंदा शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सरकारला दिला आहे.
‘शेतकऱयांची कर्जमाफी’ यासह शेतकऱयांच्या मागण्यासाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेळ्या, मेंढय़ा व पाळीव जनावरांसह हजारोंच्या संख्येने आलेले शेतकरी आणि शेकडो ट्रक्टर यामुळे तासगाव शहर ब्लॉक झाले होते.
संजय पाटील म्हणाले, शेतकरी मातीत घाम गाळून स्वतःबरोबरच जगालाही जगवतोय; पण आज या जगाच्या पोशिंदाचं जगणं अवघड झाले. गेल्या चार-पाच वर्षांत निसर्गाच्या लहरीपणा आपण अनुभवतोय, कधी नव्हे तो एवढा पाऊस पडतोय, ऑक्टोबर महिना संपत आला, तरी रानातलं पाणी संपेना आणि आमच्या शेतकऱयांच्या डोळ्यातले अश्रूही थांबेनात ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी बँकेतून कर्ज काढतोय. पैसे परत जात नाहीत म्हणून पतसंस्था खासगी सावकार यांच्या दारात जातोय. या सगळ्यातून शेतकऱयाला बाहेर काढायचे असेल तर सरकारने कर्जमाफी करणे, हाच त्यावरचा एकमात्र उपाय आहे.
तासगाव येथील बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकरी ट्रक्टर, जनावरांसह प्रचंड मोठय़ा संख्येने आले होते. ट्रक्टर, बैलगाडीसह शेळ्या, मेंढय़ांची संख्या प्रचंड असल्यामुळे तासगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर बघेल तिकडे शेतकरी व त्यांची वाहने दिसत होती. ‘चक्काजाम’ आंदोलनाला शेतकऱयांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List