खिळे, तारा ठोकून वेदना नका देऊ आम्हा; गणेशोत्सवात मांडली झाडांची व्यथा; देवगडमधील अक्षय मेस्त्री यांची कलाकृती
विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षांची कत्तल अद्याप थांबली नाही. जीवसृष्टीला जगण्यासाठी ऑक्सिजन पुरवतो. मात्र उभे असताना आमच्या अंगाखांद्यावर खिळे, तारा ठोकून आम्हाला जखमी का केले जातेय असा सवाल गणेशोत्सवाच्या सचित्र देखाव्यातून करण्यात आला आहे. देवगड तालुक्यातील गवाणेमधील अक्षय मेस्त्री यांनी ही कलाकृती सादर केली आहे.
अक्षय मेस्त्री यांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात देखाव्यातून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांची वेदना मांडली आहे. आपल्या व्यवसायाची जाहिरात करताना बिनदिक्कतपणे झाडावर खिळे, तारा ठोकून वृक्षांना विद्रुप करून नाहक जखमी करण्याचे प्रकार शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही घडू लागले आहेत. अबोल निसर्गासंपदेला अशा प्रकारचा असह्य त्रास देऊ नका. झाडे जगली तरच माणूस जगेल हे देखाव्यातून सांगण्यात आले आहे. आपल्या गणेशमंडपात प्रतिकात्मक झाडे उभी करून त्यावर खिळे, तारा अन्य तत्सम वस्तूंचा वापर करून लावलेले बॅनर असे उभे हुबेहूब चित्र साकारून वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन मेस्त्री यांनी भाविकांना केले आहे.
गणरायापुढे शैक्षणिक साहित्य ठेवा
ग्रामीण भागात आजही कोसो मैल चालून शाळेत जाणाऱ्या गरजू मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध होत नाही. अशा शाळांमध्ये दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रमही मेस्त्री यांनी केला आहे. आपल्याकडे गणपती दर्शनाला येताना लाडू, पेढे, मिठाई, फळे, धूप, कापूर, अगरबत्ती न आणता पेन, पेन्सिल, वह्या याशिवाय इतरही साहित्य घेऊन येण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मागील कलाकृती
एक एकर जमीन नांगरून त्यात तिळाची शेती करतानाच फुलांमधून भव्य दिव्य छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती साकारली. त्याचे ड्रोन छायाचित्र प्रसिद्ध झाले. तुळशीच्या पानावर विठ्ठल, नऊ विठेवर पांडुरंगाची विविध रूपे, घोंगडीवर, चिपळीवर, वारकरी टोपीवर विठुराया, वृक्ष थांबावी यासाठी नवरात्रोत्सावात झाडावर नवदुर्गेचे रुपही साकारले. अशा अजूनही विशेष कलाकृती मेस्त्री यांनी साकारल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List