बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम – अतुल लोंढे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरुम उपसा केला जात असता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी गेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. यावेळी अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी करत तुझी एवढी हिम्मत, तुझ्यावरच कारवाई करतो, अशी धमकी देऊन सुरू असलेली कारवाई थांबवा असे बजावले. बेकायदेशीर कामावर कारवाई होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्रीच जर त्याला संरक्षण देत असतील आणि कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावत असतील तर राज्यात कायद्याचे राज्य नाही हे सिद्ध होते.
अजित पवार हे फार शिस्तप्रिय असल्याचा आव आणतात. अनेक वर्षांपासून ते मंत्री तसेच उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी मंत्र्यांने एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमक्या देऊन बेकायदेशीर कामाला संरक्षण देत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. बेकायदेशीर कामांना असा राजाश्रय देणे अयोग्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही अतुल लोंढे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List