रोखठोक – महाराष्ट्राला शाकाहारी करण्याचा डाव!

रोखठोक – महाराष्ट्राला शाकाहारी करण्याचा डाव!

मुंबईवर शाकाहार लादण्याचे प्रयोग जबरदस्तीने सुरू आहेत. मुंबईसह महाराष्ट्र `शाकाहारा’तून मिळाला नाही हे भाजप व त्याच्या समर्थकांनी लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यदिनी मांसाहार विक्रीवर बंदी आदेश आणून सरकारने कहर केला. महाराष्ट्राला शाकाहारी करण्याचा हा डाव उधळून लावावाच लागेल!

महाराष्ट्राच्या अभिमानाचे दिल्ली दरबारी थडगे बांधले असे नेहमीच बोलले गेले, पण महाराष्ट्र राज्यातच महाराष्ट्राच्या अभिमानाचे थडगे देवेंद्र फडणवीस व त्यांचे भाजप महामंडळ बांधत आहे. रोज असे फतवे फडणवीस यांचे सरकार काढत आहे की, समस्त मराठी माणसाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. देशाचा स्वातंत्र्य दिन सोहळा भाजप पद्धतीने पार पडला. या स्वातंत्र्यदिनी नवे काय? तर स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांनी मांस-मच्छी विक्रीवर बंदी घातली. अचानक मांस विक्री बंदीचे आदेश का काढले? याचा कोणताही खुलासा मुख्यमंत्री फडणवीस यांना करता आला नाही. शरद पवार मुख्यमंत्री असतानाचे हे सर्व आदेश आहेत. ते अमलात आले असे हास्यास्पद उत्तर सरकारने दिले. श्री. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते त्यास 30 वर्षांचा काळ उलटून गेला. 30 वर्षांनंतर काँग्रेसच्या आदेशाचे पुनरुज्जीवन फडणवीस करत असतील तर तो विनोद आहे. शरद पवारांसारखे बहुजन समाजातले चाणाक्ष नेते स्वातंत्र्यदिनी `मांस-मच्छी नाही’ असा सरकारी आदेश काढतील, हे खरे वाटत नाही. महाराष्ट्र हा पूर्ण शाकाहारी कधीच नव्हता व महाराष्ट्राने इतरांवर मांसाहार लादला नाही. तरीही मुंबईसह महाराष्ट्रावर जबरदस्तीने `शाकाहार’ लादण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचे सरळ सरळ आक्रमण आहे. पुन्हा त्यासाठी मुहूर्त निवडला तो भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा!

संबंध काय?

स्वातंत्र्य दिनाचा आणि मांस विक्रीचा संबंध काय? याचे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे. नरेंद्र मोदी, अमित शहा हे केंद्रात आल्यापासून खाण्यापिण्याच्या बाबतीतही सर्वत्र त्यांच्या आवडीनिवडी लादत आहेत. श्री. मोदी हे संघ प्रचारक असताना त्यांना `खिचडी’ हा खाद्य पदार्थ आवडत असे म्हणून सर्व शासकीय ठिकाणी आता खिचडी आवर्जून मिळते. जनतेनेही खिचडीच खावी असा त्यांचा अट्टाहास आहे. संसदेच्या उपाहारगृहात पूर्वी मांसाहारी पदार्थ हमखास मिळत. मोदी काळात त्यावर बंधने आली व गुजरातकडील पदार्थ त्या जागी आले. हे मी स्वत: अनुभवत आहे. मोदी-शहांच्या काळात देशभरात व महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे काळात मंत्र्यांचे आणि ठेकेदारांचे `पैसे खाणे’ जोरात सुरू आहे. पैसे खाणे शाकाहारी की मांसाहारी, यावर कोणते आहारतज्ञ प्रकाश टाकणार? पुन्हा श्रीमंत पैसे खातात. असे पैसे खाण्याची मुभा गरीब आणि मध्यमवर्गीयांना नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यावर खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणतीही बंधने कोणत्याच राज्यकर्त्याने लादली नाहीत. शिवरायांनी मुसलमानांना शाकाहाराची दीक्षा दिली नाही व मोगलांनी ब्राह्मणांवर मांसाहार लादला नाही, पण महाराष्ट्रात श्री. फडणवीस त्यांच्या सरकारच्या माध्यमातून हा खाण्याचा संघर्ष घडवीत आहेत.

घरे नाकारणारे शाकाहारी

मुंबईसारख्या शहरात मांसाहार करणाऱ्या मराठी माणसांना घरे नाकारली जातात. जैन समाज, गुजराती समाज यांच्या सोसायट्यांत मराठी माणसांना प्रवेश नाकारला जातो व मराठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावर ठोस भूमिका घेत नाहीत. कारण मराठी माणसाला घरे नाकारणारे भाजपचे समर्थक आणि मतदार आहेत, पण फडणवीस यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, ज्यांच्यासाठी भाजपचा आज आटापिटा सुरू आहे, त्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला नाही. महाराष्ट्राच्या लढ्यात व स्वातंत्र्याच्या आंदोलनात मराठी माणूस लढला. गुजरातमधून आलेल्या महात्मा गांधी यांनी इंग्रजांना `चले जाव’ सांगण्यासाठी शेवटी मुंबई आणि मराठी माणसाची निवड केली. गुजरातच्या भूमीवरून स्वातंत्र्याचा लढा यशस्वी होणार नाही. तेथे व्यापारी वृत्ती आहे हे गांधींचे स्पष्ट मत होते. त्याच व्यापाऱ्यांनी मुंबईवर ताबा मिळवला व मोदी, शहा, फडणवीस या सर्व व्यापार मंडळास संरक्षण देत आहेत. मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे हा दंडनीय अपराध ठरला पाहिजे व तसा कायदा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला पाहिजे. फडणवीस हे करणार आहेत काय?

छत्रपती मांसाहारी!

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे सरदार व लढणारे मावळे मांसाहार करीत. उद्या फडणवीसांचे सरकार छत्रपतींच्या जयंती आणि पुण्यतिथीलाही मांसाहारावर बंदी टाकेल. कारण भाजपला त्याचा शाकाहारी अजेंडा अनेक मार्गांनी राबवायचा आहे. भाजपला मांसाहाराचा इतका तिटकारा असू नये. कारण महाराष्ट्रात त्यांचे आजचे सरकार पशुबळी व मांसाहाराच्या प्रसादातून निर्माण झाले. शिवसेना फोडण्यासाठी शहा यांनी अनेक प्रयोग केले. आमदारांसाठी सतत दारू-मटणाच्या पार्ट्या केल्या. त्या पार्ट्या दिल्ली-सुरतमध्येही झाल्या. सुरतमध्ये मांसाहार चालत नाही असा फतवा तेव्हा कोणी काढला नाही. सुरतमधून शिंदे यांचे आमदार गुवाहाटी येथे पोहोचले व 55-60 रेडे, बकऱ्या, कोंबड्यांचे बळी दिले. त्या बळी प्रथेची परंपरा अशी की, बळी दिलेल्या प्राण्याचे मांस शिजवून प्रसाद म्हणून भक्षण करावे लागते. त्यामुळे रेड्याचे मांस पचवून आमदार मुंबईस आले. फडणवीसांचे सरकार मांसाहारातून निर्माण झाले. तेच आता स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात मांसाहारावर बंदी आणते ते कोणाला खूश करण्यासाठी?

गटारी आणि मांसाहारी नैवेद्य

महाराष्ट्रातील खाण्यापिण्याची एक संमिश्र संस्कृती आहे. महाराष्ट्राने सर्व खाद्य संस्कृतींचा आदर केला. महाराष्ट्रातील अनेक देवदेवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. श्रावणाआधी `गटारी अमावस्या’ हा खास मांसाहारी `उत्सव आणि सण’ साजरा होतो. लोक आनंद घेतात व शाकाहारी श्रावणाकडे वाटचाल करतात. हे कोणी जबरदस्तीने करत नाही.

महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी जनांचे कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा. जेजुरी गडावर देवाला भाविक श्रद्धेने गोडाचा नैवेद्य दाखवत असतात. मात्र खाली मांसाहार वर्ज्य नाही. उद्या काही दैवतांना दाखविला जाणारा मांसाहारी नैवेद्य आणि गटारीच्या उत्सवातील मांसाहाराचे स्वातंत्र्यही हिरावून घेतले जाईल. कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे महाराष्ट्रातच बांधणारे लोक आपले राज्यकर्ते म्हणून बसले आहेत. ते भरपूर पैसे खातात व गरीब मराठी जनांच्या मांसाहाराला विरोध करतात. ते श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या रक्ताचे शोषण करतात व शाकाहारावर प्रवचने झोडतात. महाराष्ट्राचे शौर्य मारण्याचा हा उद्योग सध्या जोरात सुरू आहे!

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी? खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?
आजकाल हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्येही हृदयविकारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळेच तरुणांपासून ते...
ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ
सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची फसवणूक केली, काय म्हणाले अॅड. असीम सरोदे?
सोन्याला झळाळी, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे!
Photo – ग्रीन साडीत अनन्याचा सोज्वळ लूक