जिलेबीत साखर, समोशात तेल किती? माहिती फलक लावा; एम्स, आयआयटीसह केंद्रीय संस्थांच्या कॅण्टीन्सना आरोग्य मंत्रालयाचे आदेश
तंबाखू, सिगारेटच्या पाकिटावर कर्करोगासारखा धोक्याचा इशारा छापणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आता समोसा, जिलेबी, लाडू, वडापाव यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये किती साखर, तेल व कॅलरीज आहेत याची माहिती फलकाद्वारे द्यावी लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्स, आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या कॅण्टीन्सना तसे आदेश दिले आहेत.
सरकारने लठ्ठपणा रोखण्यासाठी समोसा, मिठाई, तळलेल्या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. खाद्यपदार्थांवर फॅट, साखर, मिठाचे प्रमाण दर्शवणारे लेबल लावणे सक्तीचे होणार आहे. यात रोज तयार करण्यात येणाऱया नाश्त्यात किती फॅट आणि साखर आहे याची माहिती देण्यात येईल.
लठ्ठपणाबाबत जनजागृती करणार
वाढत्या लठ्ठपणाबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव पुन्य सलीला श्रीवास्तव यांनी दिली. याप्रकरणी 21 जून रोजी याबाबत विविध केंद्रीय संस्थांना पत्र पाठवले आहे. याप्रकरणी जनजागृतीही करण्यात येणार आहे.
2050 पर्यंत 44 कोटी हिंदुस्थानींना लठ्ठपणाचा त्रास
2050 पर्यंत 44.9 कोटी हिंदुस्थानींना लठ्ठपणाचा त्रास होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात अमेरिकेनंतर हिंदुस्थानचा क्रमांक लागतो. खाद्यपदार्थांवर बंदी आणण्याचा सरकारचा उद्देश नाही. लठ्ठपणाबाबत जनजागृती करणे हा हेतू आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कर्मचाऱयांच्या आरोग्याचीही चेकलिस्ट ठेवा
आहार आणि पोषणतज्ञ डॉ. नुपूर कृष्णन यांनी सरकारच्या निर्देशांचे स्वागत केले. नागरिकांनी ही बाब सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवी. कॅण्टीनमधील कर्मचाऱयांना सोरायसिस किंवा त्वचाविकार आहे का, कुणाला टीबी किंवा खोकला व इतर संसर्गजन्य आजार आहेत का, याचीही चेकलिस्ट ठेवण्याचे निर्देश द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List