पायी निघालेल्या वारकऱ्याचा इनोव्हाच्या धडकेत मृत्यू
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱयावर काळाने घाला घातला आहे. मंगळवारी (दि. 1) रात्री दहा वाजता पालखीसोबत पायी चाललेल्या वारकऱयाला इनोव्हाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शेटफळ-माढा महामार्गावर घडली.
आकाश कशानराव कोंडलकर (वय 30, रा. हनुमान मंदिर, बालाजी वार्ड, गोपालपुरी, चंद्रपूर) असे मृत वारकऱयाचे नाव आहे.
मृत आकाश व त्याचे काही मित्र वेगाव (जि. यवतमाळ) येथील सद्गुरू जगन्नाथ महाराज पालखी सोहळ्यातून पंढरपूरला निघाले होते.पालखी बार्शीमार्गे पंढरपूरला जात असताना शेटफळ गावच्या हद्दीत आली. त्यावेळी उशीर झाल्याने सर्व वारकरी माढा रोडवरील हनुमंत लवटे यांच्या शेतात मुक्कामी थांबले.
दरम्यान, तेथे जागा पुरत नसल्याने आकाश व त्याचे काही मित्र पायी शेटफळच्या दिशेने दुसरी जागा शोधण्यासाठी निघाले होते. त्यावेळी भरधाव इनोव्हा गाडीने आकाशला धडक दिली. त्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. मोहोळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List