सक्ती हरली, मराठी शक्ती जिंकली; 5 जुलैला आता विजयी मोर्चा निघणार – उद्धव ठाकरे

सक्ती हरली, मराठी शक्ती जिंकली; 5 जुलैला आता विजयी मोर्चा निघणार – उद्धव ठाकरे

मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, असे नमूद करताना मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणूनच महायुती सरकारने हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द केले, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शासन आदेश रद्द केले असले तरी 5 जुलैचा मोर्चा निघणारच, फक्त आता तो विजयी मोर्चा असेल, असे जाहीर करत उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे टेन्शन आणखीनच वाढवले.

शासन आदेश रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी तातडीची पत्रकार परिषद बोलवली. मराठी माणूस एकवटला तर ती शक्ती सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते असेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला झाली होती. त्या चळवळीशी आजच्या आंदोलनाची तुलना करता येणार नाही. पण त्या वेळेलाही डाव उधळला होता आणि आजही उधळला गेला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आजच्या आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून एक झाले होते. ती एकजूट तोडायची, विभाजीत करायची आणि मराठी-अमराठी वाद निर्माण करून अमराठी मते मिळवायची असा भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा होता. पण भाषेला विरोध नाही तर सक्तीला आहे अशी समंजसपणाची भूमिका मराठी माणसाने घेतली. त्यामुळे इथे राहणाऱ्या अन्य भाषिकांनाही हे आंदोलन भाषेविरुद्ध नाही तर या राज्यातल्या मातृभाषेवर सक्ती केली जातेय हे कळून चुकले आणि फूट पडली नाही, असा भाजपचा कावा या वेळी उद्धव ठाकरे यांनी उघड केला.

5 जुलैला मोर्चा की सभा दोन दिवसांत ठरवू

हिंदी सक्तीविरोधात आज सर्व पक्ष एकवटले, आता 5 जुलैला विजयी मोर्चा काढायचा की सभा घ्यायची, ठिकाण कोणते हे दोन दिवसांत सर्वांनी मिळून ठरवूया, असे आवाहन या वेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

स्वयंघोषित अनाजीपंत फडणवीसांनीच जीआर काढला

हिंदी सक्तीचा जीआर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काढला होता, असा आरोपही फडणवीस यांनी केला होता. त्याबाबत इतिवृत्तांत सांगत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा खोटेपणा उघड केला. नवे शैक्षणिक धोरण आल्यानंतर काय करायचे हे ठरवण्यासाठी माशेलकर समिती नेमण्यात आली होती आणि ती प्राथमिक नव्हे तर उच्च शिक्षणासाठी होती, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या समितीने अहवाल सादर केला, त्यावर अंमलबजावणी कशी करायची यासाठी आपण अभ्यास गट नेमला होता. तो नेमल्यानंतर आपले सरकार पाडले गेले. त्यामुळे आपल्यासमोर तो अहवाल आलाच नाही, त्याचे एक पानही आपण पाहिलेले नाही. मात्र आता तो बघण्याची मला उत्सुकता आहे, पण त्यात काहीही असले तरी हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.

आपण तो जीआर काढला असता तर तीन वर्षे काय फडणवीस झोपा काढत होते आणि मीच माझ्या जीआरची होळी करेन का, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘अफवांची फॅक्टरी’ पिक्चर काढायला पाहिजे आणि त्याच्या पोस्टरवर फडणवीस यांचे चित्र लावायला हवे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. मराठी वाचायला शिका, ते समजून घ्या आणि नंतर बोला, असेही त्यांनी फडणवीस यांना सुनावले. फडणवीस हे मराठीविरोधी आहेत, मराठीबद्दल त्यांच्या मनात विष का, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी या वेळी मुंबईतील जातीय दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण अहवालाचाही दाखला दिला. श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला होता आणि चर्चा केल्यानंतर फेटाळला गेला; पण पंतप्रधान वाजपेयींनी जबरदस्तीने त्याची अंमलबजावणी करायला लावली. त्याचा त्रास सर्व शिवसैनिकांना भोगावा लागला होता. भाजपवाले अडकले नव्हते, याची आठवण त्यांनी करून दिली.

उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या आरोपांबद्दल या वेळी पत्रकारांनी विचारले असता, मिंधे आता संपले, जो मराठीवर अन्याय होत असताना तोंडातून शब्द काढू शकत नाही तो काय करणार, असे ते म्हणाले.

मराठी माणसाने एखादे संकट येईपर्यंत एक होण्याची वाट का पहायची. आपण एकवटतोय हे बघितल्यानंतर संकटाला माघारी जावे लागले. एक संकट जे उंबरठय़ापर्यंत येऊ घातले होते त्याला आपण एकवटतोय हे बघितल्यानंतर माघारी जावे लागले. ही जाग आता कायम ठेवावी लागेल. मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. संकट आल्यानंतर उठायचे, दूर झाल्यानंतर झोपायचे असे आता नको.

समिती सक्ती करू शकत नाही

सरकारने नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी बजावून सांगितले की, कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही, सक्ती तर संपली. कोणाचीही समिती आणा सक्ती होऊच देणार नाही.

भाजपा ही अफवांची फॅक्टरी

शिवसेना आणि मनसेचे आंदोलन हे स्वार्थासाठी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्या आरोपाच्या उद्धव ठाकरे यांनी या वेळी चिंधडय़ा चिंधडय़ा केल्या. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नावाचा चित्रपट होता, तशी भाजप ही खोटय़ाची, अफवांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवायच्या, खोटेनाटे कथानक सादर करायचे, विरोधकांची बदनामी करायची आणि खोटय़ा मार्गाने विजय प्राप्त करायचा, असा भाजपचा धंदा झाला आहे. त्या धंद्याला आज मराठी माणसाने चोख उत्तर दिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता
आजकाल फार कमी वयात मुला-मुलींना डायबिटीस होताना दिसत आहे. रोजची लाईफस्टाईल पाहता डायबिटीस होणं म्हणजे अगदी सामान्य बाब झाली आहे....
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
राज्याचं महसूल वाढवण्यासाठी नवीन दारू परवाने देणं योग्य नाही, या धोरणामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं – अंबादास दानवे
Photo – काळ्या सुटमध्ये रुबाबदार सौंदर्य, वैदेही परशुरामीचा बॉसी लूक
चंद्रपुरात रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार असोसिएशनचे आंदोलन; सरकारच्या करवाढीचा केला निषेध
रशियाचे Mi-8 हेलिकॉप्टर बेपत्ता, उड्डाणानंतर काही वेळातच संपर्क तुटला
Nanded News – भाजप आमदाराची सहकार विभागाच्या उपनिबंधकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल