‘संजय राऊत काय स्वातंत्र्य लढा लढून जेलमध्ये गेले नव्हते’, रावसाहेब दानवेंनी पुस्तकावरून डिवचलं
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. संजय राऊत यांच्या या पुस्तकावर राजकीय वर्तुळातुन विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
एखादं पुस्तक लिहिणं आणि त्या पुस्तकांमध्ये आपला जीवन परिचय, राजकीय जीवनात आणि आयुष्यात कोणत्या संकटांना तोंड दिलं, एवढ्या संकटाला तोंड देऊन मी इथपर्यंत कसा पोहोचलो. जे काही महान नेत्यांनी पुस्तक लिहिलेले आहेत त्यामध्ये हे नमूद असतं. परंतु एखादं पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहायचं असेल, तर त्या पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही. असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून लगावला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांची भाषा, त्यांची बोली आणि त्यांचे हावभाव रोज सकाळी नऊ वाजता महाराष्ट्रातील जनता पाहाते. कधीतरी परमेश्वरांनी त्यांना बुद्धी दिली नाही की आपण चांगलं बोलावं म्हणून. त्यामुळे त्यांनी त्यांचे जे काही अनुभव या पुस्तकात सांगितलेले आहेत, ते काही स्वातंत्र्य लढा लढून आलेले आणि जेलमध्ये नव्हते गेले. ते कोणत्या कारणामुळे जेलमध्ये गेले होते हे त्यांनी रोखठोकमध्ये लिहावं, त्यांनी जर असं म्हटलं असतं की मी देश सेवा करताना आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करताना जेलमध्ये गेलो, आणि मला असे अनुभव आले तर ती गोष्ट आम्ही मान्य केली असती, असा खोचक टोलाही यावेळी रावसाहेब दानवे यांनी राऊत यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना टोला
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील पुन्हा एकदा डिवचलं आहे, 2019 च्या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असं म्हणून युतीनं लोकांना मतं मागितले, त्यानंतर लोकांनी आम्हाला भरभरून मत दिले, असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक युती केली, भाजपची साथ सोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली असं दानवे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List