“मूर्ख महिलेसाठी तो घर सोडणार..”; गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल काय म्हणाली पत्नी?
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे लग्नाच्या 38 वर्षांनंतर विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. आम्ही दोघं वेगवेगळे राहतोय, अशी कबुली खुद्द सुनिताने दिली होती. इतकंच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी सुनिताने गोविंदाला घटस्फोटाची नोटीसदेखील पाठवल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली होती. परंतु नंतर दोघांनी या नात्याला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घटस्फोटामागचं कारण गोविंदाचं विवाहबाह्य संबंध असल्याचंही म्हटलं गेलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिताने पुन्हा एकदा घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
“ज्यादिवशी शिक्कामोर्तब होईल किंवा माझ्या किंवा गोविंदाच्या तोंडून तुम्ही थेट ऐकलात, तर ती वेगळी गोष्ट असेल. पण मला वाटत नाही की गोविंदा माझ्याशिवाय जगू शकेल. मीसुद्धा गोविंदाशिवाय जगू शकत नाही आणि गोविंदा कोणत्याही मूर्ख व्यक्तीसाठी किंवा मूर्ख महिलेसाठी त्याच्या कुटुंबाला कधीच सोडणार नाही”, असं सुनिता ठामपणे म्हणाली. याविषयी तिने पुढे सांगितलं, “अफवा अफवा अफवा.. हे कितपत खरंय ते तरी आधी विचारा. मी कधीच हे स्वीकारणार नाही आणि जर कोणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी थेट मला विचारावं. एखाद्याने अफवा पसरवण्यास सुरुवात केली की तुम्ही त्याच्याशी सहमत होता. हे योग्य नाही. भविष्यात असं कधी काही घडलंच तर मीच सर्वांत आधी तुमच्यासमोर येऊन सगळं सांगेन. पण मला खरंच असं वाटतं की देव आमचा संसार मोडणार नाही.”
गोविंदा बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना त्याची भेट सुनिता अहुजाशी झाली होती. त्यावेळी सुनिता नववीत शिकत होती. सुनिता तेव्हा तिच्या बहिणीच्या घरी राहत होती आणि सुनिताच्या बहिणीने गोविंदाच्या मामाशी लग्न केलं होतं. गोविंदा आणि सुनिताच्या नात्याची सुरुवात फार काही सकारात्मक नव्हती, परंतु हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार बनण्याआधीच गोविंदाने सुनिताशी लग्न केलं होतं. 1986 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर चार वर्षांपर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याला सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. या दोघांना यशवर्धन आणि टीना ही दोन मुलं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List