‘वडिलांनी मला धू धू धुतला असता..’; अशोक सराफ यांचा शाळेतील भन्नाट किस्सा
अभिनेते अशोक सराफ हे मराठी कलाविश्वातील ‘महानायक’ म्हणून ओळखले जातात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीप्रमाणेच लहानपणापासूनच त्यांच्यातील अभिनयाची चुणूक सर्वांसमोर आली होती. सहा-साडेसहा वर्षांचे असताना त्यांनी पहिल्यांदा वाडीतल्या एकांकिकेमध्ये काम केलं होतं. त्यांनी शालेय शिक्षणात फारसा रस नव्हता. शाळेत अभ्यासापेक्षा त्यांच्या डोक्यात नाटक आणि सिनेमाचेच विचार जास्त असायचे. ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफ यांनी त्यांच्या शाळेतला एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
अशोक सराफ यांच्या शाळेच्या बाजूला इम्पिरिअल थिएटर होतं. त्याचसोबत स्वस्तिक आणि नाझ ही थिएटरही जवळच होती. एक दिवस त्यांचा लिमये नावाचा मित्र त्यांना मधल्या सुट्टीत म्हणाला, “चल, आपण सिनेमाला जाऊ.” त्यावर “शाळा बुडवून नको रे”, असं उत्तर सराफांनी मित्राला दिलं. तसं हे त्यांनी वरवरचंच म्हटलं होतं, कारण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायची त्यांचीही खूप इच्छा होती. अखेर मित्रासोबत ते तिकिट परवडणाऱ्या स्वस्तिक थिएटरमध्ये सिनेमा बघायला गेले. सिनेमा संपल्यानंतर शाळेच्या गेटमधून आत शिरत असतानाच वर्गातील काही मुलं त्या दोघांकडे धावत आली.
“ए लमिया, तू मेलास आता. अरे, तुझी आई आली होती शाळेत”, असं ती मुलं सांगू लागली होती. कधी नव्हे ते त्याची आई त्याच दिवशी मुलाच्या प्रगतीची चौकशी करण्यासाठी शाळेत आली होती. बघितलं तर मुलगा वर्गात नव्हताच. घरातून तर तो शाळेत यायला निघाला होता, मग कुठे गेला, असा प्रश्न विचारत त्याची आई हैराण झाली होती. अशोक सराफ आणि त्यांचा मित्र लिमये हे जेव्हा शाळेत शिरले तेव्हा त्याची आई समोरच उभी होती. त्यावेळी घाबरून अशोक सराफ यांनी मागच्या मागे धूम ठोकली अन् लिमयेला शिक्षा झाली.
सुदैवाने लिमयेनं आई किंवा शिक्षकांसमोर अशोक सराफ यांचं नाव घेतलं नाही. ‘नाहीतर माझ्या दैनंदिनमध्ये शेरा आला असता, शाळेत आमच्या दातार सरांनी आणि घरी माझ्या वडिलांनी मला धू धू धुतला असता’, असं अशोक सराफ म्हणाले. शाळेत असताना अभ्यास ही बहुधा माझ्यासाठी प्रायोरिटी नसावी, असंही त्यांनी या आत्मचरित्रात नमूद केलंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List