“समाज म्हणून आपण प्रगतीच केली नाही..”; ‘फुले’ चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक स्पष्टच बोलले..
अभिनेता प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुले’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनंद महादेवन दिग्दर्शित हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर, संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटाबाबत ब्राह्मण महासंघाकडून आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही त्यातील काही संवाद आणि जातीवाचक शब्द बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. यांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या वादावर आता दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाबद्दलचे अनावश्यक पूर्वग्रह आणि चिथावणी यांमुळे वादा झाल्याचं मत त्यांनी मांडलंय
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल निरर्थक आहेत. जरी ते बदल केले नाहीत तरी फारसा काही फरक पडणार नाही. मला असं वाटतंय की आपण सर्वजण जरा अतिसंवेदनशील झालोय आणि आपल्याला गोष्टी फार सौम्य करायच्या आहेत. पण प्रेक्षकवर्ग सुजाण आहे. जरी तुम्ही काही शब्द काढून टाकले किंवा बदलले तरी त्यांना ते समजतं. काही जणांनी फक्त ट्रेलर पाहून त्यावरून टीका करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा चित्रपट एखाद्या समुदायाविरोधात असल्याचा निष्कर्ष काढला. पण असं नाहीये. अर्थात, संघर्ष आहेत. पण ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचं सौंदर्य म्हणजे सर्व समुदायांशी त्यांचा सुसंवाद आणि एकोपा आहे.”
“फुले या चित्रपटात इतिहास काल्पनिक किंवा अतिशयोक्ती करून दाखवलेला नाही. त्याच फक्त महत्त्वाचा विषय प्रामुख्याने दाखवण्यात आला आहे. आपण अजूनही एक अपरिपक्व समाजात राहतोय. हा अपरिपक्वपणा अनावश्यक पूर्वग्रह, चिथावणी किंवा इतर कोणत्याही गोष्टींमधून दिसून येतो. एक समाज म्हणून आपण प्रगती केलेली दिसत नाही. खरंतर ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी ज्या गोष्टींसाठी संघर्ष केला, जसं की महिला शिक्षण आणि स्वातंत्र्य.. ते साध्य झालं असलं तरी आपण अनेक प्रकारे मागे पडलोय, असं दिसतं. जातीय भेदभाव आणि लिंगभेद या समस्या आपल्या समाजात अजूनही आहेत. हे प्रश्न इतक्या सहजतेने सोडवले जाणार नाहीत. म्हणून क्रांती सुरूच आहे. तांत्रिक प्रगती ही सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेल्या गोष्टींना झाकू शकत नाही. मग विवेकाचं काय? सामाजिक प्रासंगिकतेचे काय “, असा सवाल महादेवन यांनी केला.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचं कार्य यावर ‘फुले’ हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये अभिनेता प्रतीक गांधी हा ज्योतिराव फुलेंच्या आणि पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट येत्या 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List