हवामान – मानवी हस्तक्षेपाने मान्सूनला विलंब
>> श्रीनिवास औंधकर
एप्रिल-मे महिन्याचा उष्ण काळ आणि या दरम्यान हवामानात होणारे बदल यांच्या संकेतांवर येणाऱ्या काळातील मान्सूनचा अंदाज लावला जातो. हिमालयीन प्रदेशात ढगफुटी सामान्यत जुलै ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान होत असते. मात्र नुकतीच एप्रिलमध्ये जम्मू आणि कश्मीरमधील सेरी बगना भागात झालेली ढगफुटी हा हवामान बदलाचा अतिशय अपवादात्मक आणि गंभीर संकेत आहे. विषुववृत्तीय प्रदेशातील हवामान बदल, पश्चिमी विक्षोपीय वारे यांची वाढलेली तीव्रता आणि स्थानिक आर्द्र वारे यांचे मिश्रण सोबत मानवी हस्तक्षेप ही ढगफुटी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. याच्या परिणामाने यंदा मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
धुळीच्या वादळांनी आणि विखुरलेल्या पावसाने तात्पुरता दिलासा मिळवल्यानंतर, दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भाग आता तीव्र उष्णतेच्या काळात जात आहेत. आगामी महिन्यात भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात कमाल तापमानात सतत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि बिहारच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सोबतच राजस्थानातील अनेक शहरांमध्ये धुळीचे वादळ येणार आहे. गेल्या काही दिवसांत बिकानेर, चुरू, जैसलमेरसह अनेक जिह्यांमध्ये वारे वाहिल्याने या शहरांमधील कमाल तापमानात 1 ते 3 अंश सेल्सिअसची घट झाली. यासोबतच एप्रिलमध्ये जम्मू आणि कश्मीरमधील रामबन जिह्यातील सेरी बगना भागात 20 एप्रिलला झालेला प्राणघातक ढगफुटीचा हा प्रकार हवामान बदलाचा अतिशय अपवादात्मक आणि गंभीर संकेत आहे. हिमालयीन प्रदेशात ढगफुटी सामान्यत जुलै ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान होत असते. विषुववृत्तीय प्रदेशातील हवामान बदल, पश्चिमी विक्षोपीय वारे यांची वाढलेली तीव्रता आणि स्थानिक आर्द्र वारे यांचे मिश्रण सोबत मानवी हस्तक्षेप ही ढगफुटी होण्यास कारणीभूत ठरत आहेत. याच्या परिणामाने यंदा मान्सूनचे आगमन लांबणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2025 सालासाठी ‘सामान्यपेक्षा जास्त’ मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे, जो प्रमाणात्मकदृष्टय़ा दीर्घकालीन सरासरीच्या 105 टक्के असू शकतो. हे सलग दुसरे वर्ष आहे जेव्हा भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘सामान्यपेक्षा जास्त’ मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मान्सून जवळजवळ 106 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता, तर प्रत्यक्ष पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 108 टक्के होता. जून ते सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात एकूण दीर्घकालीन सरासरी 87 सेंटिमीटर (सेमी) आहे. दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सामान्य मानला जातो.
एप्रिल ते जून 2025 साठी एल निनो सदर्न ऑसिलेशन -तटस्थ परिस्थितीची उच्च संभाव्यता (96 टक्के) दर्शवितो. या तटस्थ परिस्थिती ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू राहण्याची अपेक्षा आहे. यासोबतच उन्हाळी मान्सूनमध्ये ‘तटस्थ’ एल निनो सदर्न ऑसिलेशन हा प्रमुख श्रेणी असण्याची शक्यता आहे. ला निना आणि एल निनो सदर्न ऑसिलेशन -तटस्थ यांचे एकत्रितपणे येत असल्याने मान्सूनला कोणताही धोका नाही असे दिसत आहे. सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुवीयचा प्रारंभिक अंदाज चांगल्या मान्सूनच्या शक्यतांसाठी एल निनो सदर्न ऑसिलेशनसोबत काम करेल. एल निनो सदर्न ऑसिलेशन व्यतिरिक्त, 2025 मध्ये हिंद महासागर द्विध्रुवीयदेखील ‘तटस्थ’ राहण्याची शक्यता आहे आणि मान्सून सुरू होण्यापूर्वी तो सकारात्मक होण्याची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेने असा अंदाज व्यक्त केला आहे की, एल निनो सदर्न ऑसिलेशन आणि हिंद महासागर द्विध्रुवीय ‘समकालिक’ असतील आणि 2025 मध्ये मान्सूनला सुरक्षित मार्जिनकडे नेऊ शकतात. प्रदेशानुसार, स्कायमेटने म्हटले आहे की, पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला मान्सून अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या मुख्य पर्जन्यमानित क्षेत्रांमध्ये पुरेसा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ‘पश्चिम घाटाच्या सर्व बाजूंनी आणि केरळ, किनारी कर्नाटक आणि गोव्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही स्कायमेटने म्हटले आहे.
मान्सूनच्या महिन्यांत चांगला, व्यवस्थित वितरित झालेला पाऊस देशाच्या कृषी क्षेत्रासाठी चांगला संकेत देतो. कारण या काळात भारतात वर्षभरात होणाऱ्या एकूण पर्जन्यमानाच्या 70 टक्क्यांहून अधिक पाऊस पडतो. अन्नधान्य महागाई नियंत्रणात ठेवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये चांगला मान्सूनदेखील एक सकारात्मक संकेत आहे.
सूर्यावरील डाग, दीर्घकालीन हवामान बदलाचे मुख्य चालक नसले तरी त्यांचा पृथ्वीच्या हवामानावर लक्षणीय परिणाम होतो, प्रामुख्याने सौर क्रियाकलापांमधील फरकांद्वारे सौर चक्राच्या कमाल पातळीवर असताना सूर्यावरील डागांची जास्त क्रिया, वाढत्या सौर किरणोत्सर्गाशी आणि पृथ्वीच्या सरासरी तापमानात किंचित वाढ होण्याशी संबंधित असते. सौर चक्राची कमाल मर्यादा, जी सर्वाधिक सौर क्रियाकलापांचा कालावधी आहे, जुलै 2025 च्या आसपास सौर चक्र कमाल पातळीवर येण्याची अपेक्षा आहे, या वेळेस सुमारे 115 च्या जवळपास सौर डागांची संख्या पोहोचण्याची शक्यता आहे याचा परिणाम शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पावसाळय़ाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे तर मुसळधार पावसाच्या घटना (कमी कालावधीत जास्त पाऊस) वाढत आहेत, ज्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येत आहेत.
एकूणच सन 2025 सालचा आपल्याकडे येणारा मान्सूनचा पाऊस थोडा उशिरा आगमन करेल, मात्र एकूण सरासरी एवढा पाऊस मात्र नक्की पडेल.
(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List