दोन शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला, सातारा, जावली तालुक्यांतील घटना
अस्वलाने केलेल्या हल्ल्यात सातारा तालुक्यातील जुंगटी आणि जावली तालुक्यांतील अंबरीवाडी येथील शेतकरी जखमी झाले आहेत. या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
धोंडीबा कोकरे (वय 55, रा. जुंगटी, ता. सातारा), मारुती जाधव (वय 40, रा. उंबरीवाडी, ता. जावली) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱयांची नावे आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा-जावली तालुक्यांच्या दुर्गम भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरू असून, स्थानिकांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दोन महिन्यांपूर्वी जुंगटी व केळवली येथील दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, गुढीपाडव्यादिवशी जुंगटी येथील धोंडीबा बाबुराव कोकरे हे जनावरांना चरण्यासाठी पठारावर गेले होते. दुपारी घरी परत येत असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, रोहोट बिटचे वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनील शेलार यांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांची चौकशी केली.
याचवेळी जावली तालुक्यातील उंबरीवाडी येथील एकावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी उंबरीवाडीतील मारुती श्रीरंग जाधव हे शेताकडे जात असताना, ईरा नावाच्या शिवारात त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या हातांना आणि कंबरेला चावा घेतला आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बामणोलीच्या वनपालांनी त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. रुग्णाची भेट घेऊन चौकशी करत योग्य उपचार करण्यासोबत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, वन्यप्राण्यांचे नागरिकांवरील हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List