दुष्काळी पट्टय़ात अमली पदार्थांचा सुळसुळाट, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क तसेच पोलीस विभागाचे दुर्लक्ष
जत तालुका दुष्काळी पट्टय़ात अवर्षणग्रस्त असल्याने बेरोजगारांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील 67 टक्के भाग अद्यापि तहानलेलाच आहे. उद्योग व्यवसाय व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे मानवी निर्देशांकदेखील कमी आहे. परिणामी तालुक्यात मेडिकल, जनरल स्टोअर्समधून नशायुक्त अमली पदार्थांची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जात आहे. याला तालुक्यातील तरुणपिढी बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तालुक्यात शिंदीच्या नावाखाली नशायुक्त पावडरची सर्रास विक्री सुरू आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क व अन्न व औषध प्रशासनाला पाहायलाही वेळ नाही.
अमली पदार्थांचे सेवन, सोशल मीडिया वेबवर गुह्यांची माहिती मिळत असल्याने त्याचेच अनुकरण तरुणांकडून केले जात आहे. यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात खून, मारामाऱया, दरोडे, चोरी, लूट, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार व अन्याय शोषण या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः यामध्ये तरुण पिढी गुरफटलेली आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या खून प्रकरणांतही तरुणांचा सर्वात जास्त सहभाग आहे. सामाजिक वातावरणदेखील गढूळ बनत चालले आहे.
अवैध दारूविक्री करणाऱयांवर कडक कारवाई केली जात आहे. ताडी, हातभट्टी, सिंधी याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळल्यास उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा. जेणेकरून संबंधितावर कारवाई केली जाईल. यासाठी माहिती देणाऱयाचे नाव गुपित ठेवले जाणार आहे. – दीपक सुपे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, मिरज.
जत शहरातील अल्पवयीन मुले गांजाच्या आहारी
– जत शहरातील अनेक तांडय़ांजवळ, यल्लमादेवी मंदिर परिसर, अंबाबाई वन पर्यटन क्षेत्र, पानमळा येथे नशेचा बाजार मांडला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून, येथे कधीही छापेमारी केलेली नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अल्पवयीन मुले, मुली, महाविद्यालयीन युवक व युवती गांजा, हुक्का यांसारख्या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. हायस्कूलमधील विद्यार्थी शहराजवळील मंदिर परिसर तसेच अंबाबाई वन पर्यटन क्षेत्रात, याचबरोबर मार्केट यार्ड व फलोद्यान कार्यालय परिसरात गोळा होऊन गांजासारख्या अमली पदार्थाचे सेवन करताना दिसतात. यातूनच गुन्हेगारीचे समीकरण तयार होत आहे. शहरातील ठरावीक पानपट्टीमध्येही अल्पवयीन विद्यार्थी नशा करताना दिसत आहेत. शहरातील ठराविक पानपट्टय़ांमध्ये पानाला गांजापाणी मारून पानविक्री होत असल्याने या पानपट्टीसमोर अल्पवयीन शाळकरी मुलांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
जतमध्ये कायदा-सुव्यवस्था आहे का?
n गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये जत शहरात पोलिसांचा कसलाही धाक राहिलेला नाही. तरुण मुले गांजा, अफू, चरस यांसारख्या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. यातून खून, मारामारी यांसारखे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्यातील क्राईम रेट वाढला असून, जत शहरात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे काय, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
शिंदीच्या नावाखाली नशायुक्त पेयाचा बाजार
– जत तालुक्यात हातभट्टी, शिंधीच्या नावाखाली नशायुक्त पावडरने तयार केलेली शिंदीची खुलेआमपणे विक्री केली जात आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष आहे. कर्नाटकातील हुबळी मेड, गोव्यामधून कर चुकवून दारूविक्री केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमके करतोय काय, असा सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा व कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात दारू आणली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List