लोखंडेंनी अब्रू नुकसानीचा दावा करावाच! अनिल धनवट, डॉ. भारत कर्डक यांचे खासदार लोखंडे यांना आव्हान
‘खासदार सदाशिव लोखंडे यांनी अब्रूनुकसानीचा दावा करावा, अशी आमचीही भूमिका आहे; अन्यथा त्यांनी पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीतून माघार घ्यावी. शिर्डीकरांची माफी मागावी,’ असे आव्हान स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल धनवट व डॉ. भारत कर्डक यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष, तसेच राष्ट्रपती यांना तक्रार दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे व त्यांचा मुलगा प्रशांत लोखंडे यांनी पदाचा गैरवापर करीत अनुदान लाटल्याचे पत्रकार परिषद घेऊन मान्य केले आहे. आता त्यांनी समोरासमोर आमच्या इतर प्रश्नांचा खुलासा करावा,’ असे जाहीर आव्हान शेतकरी अनिल धनवट आणि डॉ. भारत कर्डक यांनी दिले आहे.
‘खासदार सदाशिव लोखंडे यांनी खेमानंद दूध आणि कृषी प्रोडय़ुसर कंपनीमार्फत केंद्र शासनाचे कोटय़वधी रुपयांचे अनुदान घेऊन कांदा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. शेतकऱयांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा, त्याचे दर स्थिर राहावेत आणि याचा फायदा सामान्य कांदा उत्पादक शेतकऱयांना व्हावा, यासाठीची ही योजना आहे. मात्र, त्यांनी हे अनुदान घरातील उत्पादक कंपनीद्वारे लाटण्यासाठी खासदारपदाचा दुरुपयोग केला,’ असा आरोप धनवट आणि कर्डक यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावर लोखंडे यांनी खुलासा केला आणि अनुदान खेमानंद कंपनीला मिळवून दिल्याचे मान्य केले. कर्ज आणि अनुदान नियमानुसार घेतले आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
‘शेतकऱयांसाठी काम करायची अजबच पद्धत असून, शेतकऱयांना याचा काय उपयोग झाला? किती कांदा खरेदी झाली? त्याची रक्कम किती होते? अनुदान किती घेतले? हे आकडे जुळत नाहीत. चार वर्षांपासून 32 कोटींचा प्रकल्प उभा करीत आहात. तिकडे 20 हजार कोटींचे नवे संसद भवन बांधून झाले, दीड हजार कोटींचे श्रीराम मंदिर बांधून झाले; पण आपल्याकडून काही 32 कोटींचा प्रकल्प उभा राहिला नाही. शेतकऱयांसाठी करायचे तर मग मतदारसंघातील शेतकरीपुत्र भेटले नाहीत का? शिर्डी मतदारसंघात जागा नाही म्हणता, तर श्रीरामपूर अन् पांढरीपूल एमआयडीसी रिकाम्या आहेत, लोकांना काम नाही; परंतु यांना स्वतःचेच घर भरायचे आहे, असे दिसते,’ असा आरोप धनवट यांनी केला.
नेवासा तालुक्यामध्ये आपल्या पुढाकाराने 2018 साली किसान कृषी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. मात्र, तेथे अद्यापि काहीही काम झालेले नाही. शिर्डी मतदारसंघात सर्वसामान्य शेतकरी संचालक असणाऱया दहापेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या सहा वर्षांपासून खासदार लोखंडे यांनीच स्थापन केलेल्या आहेत. परंतु जेव्हा कोटय़वधी रुपये अनुदान घेण्याची वेळ आली, तेव्हा मात्र फक्त पत्नी अन् मुले संचालक असणाऱया कंपनीचे नाव पुढे केले. कंपनी कायदा-1956 किंवा 2013 असला, तरी प्रोडय़ुसर कंपनीची उद्दिष्टे समान आहेत. संचालकावर जास्तीची जबाबदारी टाकून कंपनीला अधिक सभासदाभिमुख करण्यासाठी 2013चे बदल करण्यात आलेले आहेत. आपण त्या बदलांना हरताळ फासला असल्याचे सिद्ध झाले आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना माहिती देणार
n ‘सदाशिव लोखंडे यांनी मानहानीचा दावा नक्की करावा, म्हणजे आम्हाला कोर्टात आमचे म्हणणे मांडता येईल. नाहीतर आम्ही तर कोर्टात जाणारच आहोत. प्रभावशाली व्यक्तींच्या कंपन्यांना वेगळा आणि सामान्यांच्या कंपन्यांना वेगळा न्याय, याची न्यायालयीन चौकशी व्हावी, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. या विषयाची माहिती आम्ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देणार आहोत,’ असे धनवट आणि कर्डक यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List