पिसोरी हरणाची शिकार करणारी चौघांची टोळी अटकेत

पिसोरी हरणाची शिकार करणारी चौघांची टोळी अटकेत

मेढा आणि महाबळेश्वर तालुक्याच्या सीमेवरील घनदाट जंगलात पिसोरी हरणाची शिकार करणाऱया चौघांच्या टोळीला वन विभागाने शिताफीने अटक केली. या टोळीकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारी गावठी बंदूक, काडतुसे, वाघर, कोयता व शिकार केलेली पिसोरी हरीण जप्त केली आहे. महाबळेश्वर, मेढा वन विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

शिवाजी चंद्रकांत शिंदे, दीपक शंकर शिंदे, आदित्य दीपक शिंदे (तिघेही रा. कुरोशी, ता. महाबळेश्वर) आणि गणेश कोंडिबा कदम (रा. गोगवे, ता. महाबळेश्वर) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील आरोपींची नावे आहेत.

महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात कोणी शिकार करू नये, यासाठी वन विभागाच्या वतीने नियमित गस्त सुरू असते. या पथकाला मेढा येथील पथकाचीही मदत मिळते. आज पहाटे महाबळेश्वर व मेढा येथील वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना राजमार्गावरील मोळेश्वर फाटा ते सह्याद्रीनगर रस्त्यावर राखीव वनात दोन व्यक्ती संशयितरीत्या रस्त्यावर आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱयांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी दोघांची चौकशी सुरू केली. त्यांनी दिलेल्या उत्तराने वन विभागाच्या कर्मचाऱयांना संशय आला. वन विभागाच्या कर्मचाऱयांनी दोघांजवळ असलेल्या सामानाची तपासणी केली असता शिकारी टोळीचे बिंग फुटले. दोघांजवळ पिशवीत वाघर, काडतुसे व कोयता आढळून आला. हे दोघे शिकारी असल्याची वन विभागाची खात्री झाली. दोघांची कसून चौकशी केली असता त्यांचे आणखी दोन साथीदार जंगलात असल्याचे समजले. वन विभागाने त्या दोघांच्या माहितीने छापा टाकून अन्य दोघे असे चौघांना अटक केली. वन अधिकाऱयांनी त्यांच्या ताब्यातून गावठी बंदूक व बंदुकीच्या मदतीने शिकार केलेली पिसोरी हरीण व इतर साहित्य जप्त केले. या चौघांनाही महाबळेश्वर येथील विश्रामगृहावर आणले. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक महेश झांजुर्णे, महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल गणेश महांगडे यांनी या टोळीवर गुन्हा दाखल केला.

मेढा येथील वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे, बामणोली वनपाल नीलेश रजपूत, तापोळा वनपाल अर्चना शिंदे, वनरक्षक रमेश गडदे, अभिनंदन सावंत, लहू राऊत, स्वप्नील चौगुले, राहुल धुमाळ, स्नेहल शिंगाडे, संगीता शेळके, संदीप पाटोळे या वन विभागाच्या कर्मचाऱयांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल गणेश महांगडे अधिक तपास करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;