कोपरगावात महायुतीच्या मेळाव्याला, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची दांडी
शिर्डी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगावात शनिवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित झाला. या मेळाव्याकडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात चर्चा सुरू होती.
शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यात लढत होणार आहे. दोनवेळा खासदार असल्याने मित्रपक्षासह जनतेत असलेली नाराजी, नामदार विखे यांनी घेतलेले पालकत्व, कोल्हे-विखे वाद, अशोक काळे व सदाशिव लोखंडे यांच्यातील पूर्वीचा बेबनाव अशा वातावरणात लोखंडे यांची सर्व मदार भाजपवरच आहे. मात्र, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी सांगितल्यावर तरी भाजपचे कार्यकर्ते लोखंडे यांचे काम नेटाने करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे- कोल्हेंचे प्राबल्य आहे. यापैकी कोपरगाव तालुक्यातील भाजप प्रदेश सचिव आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे नाराज आहेत. शहरात मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली. एकाच पक्षात असून, गेल्या काही महिन्यांपासून कोल्हे आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच कोल्हे यांनी विखे पाटलांसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले असल्याचे बोलले जातेय.
विखे यांनी लोखंडे यांचे तिकीट आणले आहे. त्यामुळे रिपाइंमध्ये रामदास आठवले यांचे तिकीट कापले गेल्याची नाराजी आहे. आज दिसत नसले तरीही 2014च्या आशुतोष काळे यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मदत करण्याची अपेक्षा असताना लोखंडे यांनी दगाबाजी केल्याचे शल्य अशोक काळे यांना कुठेतरी आहेच, त्यामुळेच मतदारसंघांतील हे चित्र महायुतीत बेबनाव निर्माण करणारे आहे.
2014 व 2019 असे दोनवेळा कोपरगावच्या जनतेने तुम्हाला निवडून दिले. मात्र, दोन्ही वेळेस काम करण्यात तुम्ही कमी पडलात, असा इशारा खासदार लोखंडे यांना आमदार आशुतोष काळे यांनी जाहीर व्यासपीठावर दिला. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात सर्वांना गृहीत धरून जरी विखेंनी लोखंडे यांचे पालकत्व घेतले असले तरीही सर्व आलबेल असल्याचे म्हणता येणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List