पुण्यात नो वॉटर… नो वोट, निवडणुकीच्या तोंडावर पाणीप्रश्न गंभीर
मागील काही दिवसांपासून पुण्याचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरातील काही भागांसह उपनगराच्या भागात असमान पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावरच पुण्यात शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा नाहीतर ‘नो वॉटर… नो वोट’, ‘मतदानावर बहिष्कार’ असे फलक लावून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पालिकेत पाशवी बहुमत असतानादेखील पुण्याचा समान पाणीपुरवठ्याचा प्रश्न वेळेत न सोडविल्याने निवडणुकीत याचा भाजपला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
तत्कालीन महापालिकेतील सत्ताधारी भाजपने चोवीस तास पाणीपुरवठ्याची घोषणा केली होती. मुदत संपली तरी अद्याप पुणेकरांना चोवीस तास सोडा अनेक भागांत पिण्यापुरते आणि वेळेवर सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. शहराच्या अनेक भागांत पुरेसे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागते. नव्याने समाविष्ट गावांमुळे पाण्याच्या मागणीत आणखी भर पडत आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या समान पाणीपुरवठा योजनेमध्ये पाण्याचे मीटर्स बसविण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. दुसरीकडे ज्या ठिकाणी नळांना पाणीच नाही तेथे अखेर टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे. आता तर उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर शहरात पाणी टंचाई तीव्र होऊ लागली आहे. मार्च महिन्यापासून टँकरच्या संख्येत वाढ झाली असून, दोन महिन्यांत पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीनंतर पाणीकपात !
पुण्यात यंदा कमी पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा पुणेकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे शहराला होणारा दररोजच्या पाणीपुरवठ्यात खंड पडू शकतो. कालवा समितीच्या बैठकीत सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या मतदान झाल्यानंतर पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आतापासूनच रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List