नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा; आज, उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी
अर्बन बँक बोगस कर्जप्रकरण घोटाळ्यात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे. शेकडो आरोपी असलेल्या या घोटाळ्याने 109 वर्षे जुनी बँक बंद पडली. यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत, तर कर्मचाऱयांवर टांगती तलवार आहे. या बोगस कर्जप्रकरणी उद्या (1 एप्रिल) आणि मंगळवारी (2 एप्रिल) होणारी सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, संचालक, कर्जदार आणि ज्यांचा आतापर्यंत काहीही सहभाग दिसत नव्हता, त्यांनीही अटकपूर्व जामीन ठेवल्याने घोटाळ्यातील सस्पेन्स वाढू लागला आहे. तसेच आरोपींची यादी कोणी लीक केली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
संगमनेर येथील अटकेत असलेले अमित पंडित यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (2 एप्रिल) युक्तिवाद होणार आहे, तर राजेंद्र लुणिया, कर्जदार प्रवीण लहारे, कर्जदार अविनाश वैकर यांच्या जामीन अर्जावर उद्या (1 एप्रिल) युक्तिवाद होणार आहे. संचालक कमलेश गांधी यांनी अटकपूर्व जामीन ठेवला असून, निवृत्त वरिष्ठ अधिकारी एम. पी. साळवे, नवीन गांधी, सतीश शिंगटे, सतीश रोकडे यांच्या अटकपूर्व जामिनावरही उद्या (1 एप्रिल) युक्तिवाद होणार आहे. तसेच प्रगती देवेंद्र गांधी यांच्या अटकपूर्व जमिनावर 1 एप्रिल रोजी युक्तिवाद होणार आहे.
अर्बन बँक बोगस कर्ज घोटाळाप्रकरणी राजेंद्र गांधी यांनी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात संचालक, बँकेचे अधिकारी यांच्यासह 100पेक्षा जास्त आरोपींची संख्या असून, अनेक बोगस कर्जदार सामील आहेत. ज्या व्यक्तीची कुवत हजार रुपये भरण्याची नाही, त्याच्या नावे कोटी-कोटी रुपयांचे कर्जे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, कर्ज दिल्यानंतर कर्जातील काही रक्कम संचालकांच्या खात्यावर जमा झाली आहे. या प्रकरणात पकडलेले कर्जदार ज्या कहाण्या सांगत आहेत, त्यावरून हा घोटाळा ठरवून झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे.
सध्या जे संचालक अटकेत आहेत आणि जे पळून गेले आहेत, ते सर्वजण अटक टाळण्यासाठी जामीन अर्ज दाखल करीत आहेत. विशेष म्हणजे, कर्जदार नसताना आणि संचालक नसताना अटकपूर्व अर्ज ठेवणारे बरीच लोक यामध्ये सामील असल्याचे लक्षात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, देवेंद्र दिलीप गांधी यांच्या अटकपूर्व जामिनावर पोलीस न्यायालयात काय म्हणणे सादर करतात, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यामध्ये देवेंद्र दिलीप गांधी, प्रगती देवेंद्र गांधी, कमलेश गांधी आणि यज्ञेsश चव्हाण यांचे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल होणे हे आश्चर्यजनक आहे. कारण आरोपींची यादी ही गोपनीय होती, तरीदेखील या व्यक्तींना आपण आरोपी आहोत, हे कसे कळले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आरोपींची नावे समजणे हा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List